Maharashtra Weather News : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात उकाडा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ पर्यंत पोहोचला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यातच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे तापमानाचा पारा कमी होईल अशी आशा ठेवलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अद्यापही उष्णतेची लाट संपलेली नाही. पुढील चार दिवस हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्णतेचा यल्लो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ६ मे २०२६ ते ९ मे २०२६ पर्यंत उकाडा वाढणार आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस उकाडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्याला ७ मे ते ९ मे पर्यंत उष्णतेचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचे संकेत...
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढण्याचे संकेत असताना रत्नागिरी जिल्ह्याला मात्र अवकाळीचे संकेत देण्यात आले आहेत. ७ मे, गुरुवारी आणि ८ मे, शुक्रवारी रत्नागिरीत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या येलो अलर्टसह पावसाचाही अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world