जाहिरात

Amravati News : दोन वर्षे समाजाबाहेर, अखेर 10 जणांविरोधात गुन्हा; कुटुंबासाठी महिला जात पंचायतीशी भिडली

जातपंचायतीच्या प्रमुखांसह 10 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Amravati News : दोन वर्षे समाजाबाहेर, अखेर 10 जणांविरोधात गुन्हा; कुटुंबासाठी महिला जात पंचायतीशी भिडली

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जातपंचायतीच्या घटना समोर येत असून यामुळे अनेक कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अमरावतीतील गाडी लोहार समाजाच्या करण चव्हाण यांच्या कुटुंबाने जात पंचायतीने दिलेला निर्णय मान्य केला नाही म्हणून गेल्या दीड वर्षापासून बहिष्कृत करण्यात आलं होत. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत ही संपूर्ण घटना घडली आहे. हे कुटुंब अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतं. या कुटुंबाला समाजातील लग्न असो, मृत्यू असो वा कोणी आजारी असो तरीही कुठेही बोलावलं जात नाही. अखेर या प्रकरणात कुटुंबातील महिलेने अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आता जातपंचायतीच्या प्रमुखांसह 10 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमके प्रकरण काय?
गाडी लोहार समाजाचे करण चव्हाण अमरावतील गाडगेनगर भागात राहत होते. करण चव्हाण यांच्या पत्नीकडे एक महिलेने तक्रार केली होती. ही महिला करण चव्हाण यांच्यापासून गर्भवती असून तिला त्यांच्यांशी लग्न करायचं तिने सांगितलं होतं. या महिलेने करण चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र करण चव्हाण यांनी आपलं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. त्यावेळी या महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याचंही करण चव्हाण यांनी स्पष्ट केलं. शेवटी या महिलेने जात पंचायत कार्यालयात करण विरोधात तक्रार दाखल केली. त्यावर पंचायतीने तक्रारदार महिला व तिच्या पतीला बोलावून घेतले. तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा आदेश दिला. मात्र करण चव्हाण यांनी या लग्नास नकार दिल्याने जातपंचायतमधील दहा जणांनी कुटुंबाला समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील जी व्यक्ती या कुटुंबाशी संबंध ठेवेल त्यांनाही समाजाबाहेर काढलं जाईल, असा आदेश दिला.

Buldhana News : बुलढाण्यातील केसगळतीची देशपातळीवर चर्चा, मोदी सरकारकडून दखल; तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली!

नक्की वाचा - Buldhana News : बुलढाण्यातील केसगळतीची देशपातळीवर चर्चा, मोदी सरकारकडून दखल; तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली!

जातपंचायतीने पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकत, कोणत्याही व्यक्तीने या कुटुंबाशी संवाद साधल्यास त्यांनाही समाजाबाहेर काढण्याचा आदेश दिला. हा अन्याय सहन न करता थेट जातपंचायतीशी भिडत कुटुंबातील महिलेने पोलीस ठाणे गाठले. तिच्या या धाडसी कृतीमुळे जातपंचायतीतील दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

14 ऑगस्ट 2024 रोजी जातपंचायतीने निर्णय दिल्यापासून हे कुटुंब सामाजिक बहिष्काराचा अन्याय सहन करीत होते. मात्र आता पोलिसात तक्रार दाखल झाल्याने आता या कुटुंबाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. एकाकी पडलेलं हे कुटुंब आता तरी समाजाच्या जवळ जाईल का आणि समाज त्यांना स्वीकारून आपलंस करेल का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातपंचायत चालते हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे पोलिसांनी या दहा जणांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जात पंचायतीवर बंदी... महाराष्ट्र सरकारकडून 2017 मध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करण्यात आला. जात पंचायत बसल्याची माहिती मिळताच त्यावर पोलीस गुन्हा नोंदवू शकतात. 

जात किंवा खाप पंचायतील त्या त्या भागातील किंवा गावातील किंवा गोत्रांच्या नावाने खाप पंचायत चालविल्या जातात. या पंचायतीकडून समाजातील सामाजिक वा सांस्कृतिक विषयांची नियमावली केली जाते. समाजातील कोणतेही प्रश्न मग ते कौटुंबिक असो वा सार्वजनिक... ते पंचायतीसमोर मांडण्याची प्रथा. पंचायत जो निर्णय देईल तो मान्य करणं त्या समाजातील व्यक्तीला बंधनकारक असतं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com