राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रेयसी बोलत नसल्याच्या नैराश्यातून सोहम राजाराम पवार नावाच्या एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम राजाराम पवार याची प्रेयसी गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याच्याशी बोलत नव्हती. या प्रकारामुळे सोहम मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आणि नैराश्येत गेला होता. याच नैराश्येतून त्याने बुधवारी विषारी पदार्थ प्राशन केले.
(नक्की वाचा- ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने)
उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल
विष प्राशन केल्यानंतर सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्याला तातडीने देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, सोहमची प्रकृती गंभीरअसल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- BMC Recruitment: मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अनुपस्थित विद्यार्थ्यांना 'या' तारखेला शेवटची संधी)
देवरूख पोलिस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. देवरूख पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यामागील नेमके कारण तपासले जात आहेत.