
पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येणार आहे. शिवाय मेट्रो स्थानके, विमानतळ आणि पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात 10 हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व सोलापूर या आठ शहराचा समावेश करण्यात आला आहे. पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे. या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच समाजातील स्थान बळकट करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. पिंक ई रिक्षा योजनेकरीता 25 हजार रुपये केंद्रशासन आणि 75 हजार रुपये राज्यशासनाच्यावतीने अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. विविध बँकेच्या माध्यमातून 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महिला वर्गाच्या सुरक्षिततेकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. पिंक ई रिक्षा योजना समाजातील महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे. चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरित्या चालविण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांचीदेखील काळजी घ्यावी. पिंक रिक्षा चालविणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्ररेणास्त्रोत ठरतील, अशा विश्वास व्यक्त यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राज्यात महिलांच्या उन्नती व बालकांच्या विकासाकरीता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्टया सक्षमीकरणाकरीता महिलांना दीड हजार रुपयांचा ‘सन्मान निधी' देणारी ‘लाडकी बहीण योजना'आगामी काळातही सुरुच राहणार आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.
येत्या काळात पुणे येथे 1 हजारापेक्षा अधिक ई-वाहन चार्जिंग स्थानक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिंक ई- रिक्षा मेट्रो स्थानके, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांची सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच ओला व उबेर कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात येत आहे. यामुळे महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल, पर्यायाने महिलांना रोजगारही उपलब्ध होईल, असे यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी पिंक ई-रिक्षा योजना आहे. असं यावेळी निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world