जाहिरात

Leopard Control: पुणे-नगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत मोठा निर्णय; काय आहे सरकारचा प्लान?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती अजित पवार यांनी दिली.

Leopard Control: पुणे-नगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत मोठा निर्णय; काय आहे सरकारचा प्लान?

राहुल कुलकर्णी, पुणे

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेडसह दौंड आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व पारनेर तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांची वाढती संख्या पाहता, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी आणि स्थलांतर करण्याचा निर्णय झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती अजित पवार यांनी दिली. या निर्णयानुसार, बिबट्यांच्या नसबंदी आणि स्थलांतराचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

या उपायांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. ऊसशेती आणि मानवी वस्त्यांमध्ये वावर असलेल्या बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त केले जाणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा आणि स्थलांतराचा मार्ग

बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करताना अजित पवार यांनी थेट केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी करणे आवश्यक आहे, अशी सूचना यादव यांनी पवार यांना केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.

या निर्णयामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 125 बिबटे पकडण्यात येणार असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. विशेष म्हणजे, पकडलेल्या बिबट्यांपैकी सुमारे 50 बिबटे गुजरात राज्यातील 'वनतारा' प्रकल्पामध्ये पाठवण्यात येणार असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी 'दिवसा वीजपुरवठा'

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या हल्ल्यांना बळी पडतात. या पार्श्वभूमीवर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंडसह अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि पारनेर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासंदर्भातील सूचना महावितरणला करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com