राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे नव्या रंगात आणि नव्या ढंगात विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्या जन सन्मान यात्रेची सुरूवात झाली आहे. यावेळी त्यांनी मतदारांना सरकार काय काम करत आहे याची यादीच मांडली. शिवाय महायुतीला पुन्हा संधी द्या असे आवाहन केले. ज्या योजना जाहीर झाल्या आहेत त्या सरकार आल्यानंतर पुढच्या काळात सुरू राहातील हा दादाचा वादा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं असं सांगत विधानसभेला निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेला आजपासून नाशिकच्या दिंडोरीतून सुरू झाली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सहा हजार कोटीच्या फाईलवर सही
जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही हात जोडून जनतेचे ऐकतो. आम्ही राजे नाही तर जनसेवक आहोत असे या यात्रे वेळी अजित पवारांनी सांगितले. आज माझ्या राजकीय जिवनाला 33 वर्षे झाली आहेत. मी अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. अनेकांनी मला भावाच्या नात्याने राखी बांधली, सेल्फी काढले. आता रक्षा बंधन येत आहे. या निमित्ताने माझी लाडकी बहीण योजना दिली आहे. 19 तारखेला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न चालला आहे की 17 तारखेला जुलै- ऑगस्टचे पैसे नियमांत बसणाऱ्या महिलांना द्यायचे असे अजित पवारांनी आवर्जून सांगितले. बुधवारी सहा हजार कोटींच्या फाईलवर सही करून आलो आहे ही सांगायला अजित पवार विसरले नाही.
'हा अजित दादाचा वादा'
महायुतीच्या योजना या जुमला आहेत असं विरोधक म्हणत आहेत. या योजना तात्पुरत्या असल्याचंही सांगितलं जात आहे. पण मी सांगतो की या योजना तात्पुरत्या नाहीत. पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी तुम्ही पाठबळ द्या. तुमचे आशिर्वाद महायुतीला द्या. पुढील पाच वर्ष ही योजना चालेल हा अजितदादांचा वादा आहे असे जाहीर पणे त्यांनी यावेळी सांगितले. गरीब शेतकऱ्याचे वीजबिल माफ करायचे हे बरेच दिवस डोक्यात होतं. साडेसात हॉर्सपावरपर्यंतचे बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. पुढचे बिल भरायचे नाही. मागचेही बिल द्यायचे नाही. अर्थमंत्री म्हणून मी सांगतो, कोण वायरमन आला तर सांगा की ते अजित पवार म्हणालाय की देऊ नका म्हणून असे अजित पवारांनी सांगून टाकले.
हे ही वाचा: ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान
'कांद्याने वांदा केला'
लोकसभा निवडणुकीत कांद्याने आमचा वांदा केला याची कबुली अजित पवारांनी यावेळी दिली. कांदा निर्यातबंदी झाली की शेतकरी अडचणीत येतो. कांद्याने आमचा वांदा होतोय. त्यामुळे कांदा निर्यात चालू ठेवा असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना सांगितलं आहे असं ते म्हणाले. कांद्यावर कर लागतो तो देखील जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान समुद्रात वाहून जाणारं पाणी नार- पार योजने अंतर्गत दुष्काळी भागात वळवण्याची सरकारची योजना आहे. नाशिकची तहान भागवणार. किकवी हे नवे धरण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे अजित पवारांनी आवर्जून सांगितले.
हे ही वाचा: "मी ढेकणाला आव्हान देत नाही", उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका
'80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण'
विरोधकांनी आमच्याबद्दल कितीही वेडेवाकडे बोलले, शिव्या दिल्या तरी त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे असं अजित पवार म्हणाले. ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण ही आमची भूमिका आहे. इतके दिवस तुम्ही इतरांना बघितलं आता आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही जे बोलतो ते कृतीत उतरवतो. लेक लाडकी योजना , मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपये खात्यात जमा होणार. जर जुळ्या मुली झाल्या तर दोघींनाही लाभ मिळणार. जुळी झाली म्हणून दोघींना 1 लाख 1 हजार विभागून देणार नाही असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.