![ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान](https://c.ndtvimg.com/2023-05/3i851hs8_uddhavthackerayani_640x480_11_May_23.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूवया मात्र नक्कीच उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. ठाकरे यांना जनतेची सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांनी आघाडीचे नेतृत्व करावे असा मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचाच आधार घेत ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदा बाबत मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत केलेल्या या वक्तव्यामुळे त्याला महत्वही प्राप्त झाले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदा बाबतचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना दिल्लीत विचारला गेला. शिवाय तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतूक करतात असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, जर मी मुख्यमंत्री असताना माझ्या सहकाऱ्यांना माझे काम आवडले असेल तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडेल का असे त्यांनाच विचार असे सांगितले. शिवाय जर कोणाची हरकत नसेल तर सर्वांनी मिळून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. मला त्याबाबत काही अडचण नाही. असे वक्तव्य करत आपण पु्न्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास तयार असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत.
मविआच्या बैठकीत काय ठरणार?
महाविकास आघाडीची स्थापना ही कोण्या एका व्यक्तीसाठी झाली नसल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात असलेल्या महायुतीला सत्तेतन फेकून देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीची सत्ता आम्ही उलथवून लावू असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र बसून कोण मुख्यमंत्री असेल ते सत्ता आल्यानंतर ठरलू असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?
शिंदे गटातल्या नेत्याना पक्षात घेणार का?
शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदें बरोबर जवळपास चाळीस आमदार गेले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यातल्या अनेक आमदारांमध्ये चलबिचल आहे. अशात त्या आमदारांना पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घेणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर सर्वांनाच चक्रावून टाकणारे उत्तर उद्धव यांनी दिले. त्या गटात राहून जर ते मला मदत करणार असतील तर काय हरकर आहे. आम्ही त्यांना सध्या तपासून पाहात आहोत असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. शिवाय ते खबरीचे काम करत असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे शिंदेंचे टेन्शन मात्र वाढणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?
सांगलीचा वाद मिटला?
सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर नाराज होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरही ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते दोघेही भेटले. विशाल, विश्वजित आणि चंद्रहार हे तरूण नेते आहेत. त्या निवडणुकीत काही तरी चुकीचे झाले आहे. पण आम्ही भाजपला तिथे हरवले हे महत्वाचे आहे. असे काही चुकीचे विधानसभा निवडणुकीत होणार नाही अशी ग्वाही आता त्या दोन्ही नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुख धरून बसण्यात काही अर्थ नाही. विधानसभेला आम्ही एकत्रीत निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world