योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला शहरातील उड्डाण पुलावर आज दुपारी (मंगळवार, 17 मार्च 2026) एक थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली. धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही सेकंदातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. ही घटना एवढी भीषण होती की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
नेमकं काय घडलं?
दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावरून कार जात असताना अचानक त्यातून धूर निघू लागला. सुरुवातीला हा धूर किरकोळ वाटत होता, पण पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढले. भररस्त्यात कार जळत असल्याचे पाहून इतर वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक प्रवाशांनी भीतीपोटी आपली वाहने दूर उभी केली, तर काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केले. या भीषण आगीमुळे उड्डाण पुलावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
( नक्की वाचा : Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला )
ड्रायव्हरचे प्रसंगावधान आणि 5 जणांना जीवदान
या कारमध्ये रिसोड येथील 5 प्रवासी प्रवास करत होते. कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने अजिबात वेळ न घालवता गाडी बाजूला उभी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने त्वरित सर्व प्रवाशांना गाडीबाहेर काढले. सर्व जण बाहेर पडल्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. ड्रायव्हरच्या या तत्परतेमुळे कारमधील 5 जणांचे प्राण वाचले आहेत. चालकाने थोडा जरी उशीर केला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये होती.

अग्निशामक दलाची कारवाई आणि आगीचे कारण
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची 2 वाहनं तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली आणि रस्ता मोकळा केला. या घटनेत वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी कोणालाही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world