योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News : अकोला शहरात गंभीर गुन्हा घडण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क कारवाईमुळे संभाव्य दरोड्याचा कट उधळण्यात आला आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशिम बायपास परिसरात छापा टाकत कुख्यात टोळीतील तिघांना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान,गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. निहाल अहमद फिरोज अहमद (२६,अमरावती),सैय्यद अली सैय्यद अनिस (२२,शेगाव) आणि शेख इलीयास शेख अयाज (२५,अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर जुनेद (पूर्ण नाव अज्ञात) आणि एक अनोळखी आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
शनिवार १४ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,काही संशयित आरोपी वाशिम बायपास जवळील अंबिका नगर रस्त्यावर एका कारची नंबर प्लेट बदलून संशयास्पद हालचाली करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीनं घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी परिसरात सापळा छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
नक्की वाचा >> दिवंगत अजित पवारांच्या जागेवर 23 एप्रिलला मतदान, राहुरी, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर, निकाल कधी?
अटक केलेल्या आरोपींची व वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्तुल,दोन जिवंत काडतुसे,एक चाकू,एक लोखंडी आरी,चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क,हँडग्लोज,तीन मोबाईल फोन,वाहनाचे खोटे नंबर प्लेट आणि एक कार असा एकूण १० लाख ५९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
पोलिसांनी आरोपींची गुन्हेगारी नोंद तपासली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपींनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून एका व्यापाऱ्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यावेळी राजस्थानमधील कोटा येथे स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडून व्यापाऱ्याची सुटका केली होती आणि त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुल जप्त केल्या होत्या.तसेच अटक आरोपी शेख इलीयास याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून २०२२ मध्ये त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. आरोपींच्या हालचाली, शस्त्रसज्जता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते अकोल्यात मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा >> Pune News: आनंदाची बातमी! पुणे शहरात आता 'नो ट्रॅफिक' जॅम, CM फडणवीसांची मेट्रोबाबत सर्वात मोठी घोषणा
जुनेशहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
या प्रकरणी अटक आरोपींविरुद्ध जुनेशहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ आणि ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अकोला शहरात घडू शकणारा मोठा गुन्हा टळल्याची चर्चा शहरात होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world