भाजपच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्त्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार आहेत. त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिला असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. शिवाय शहा यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरेही होते. ठाकरेंचा उल्लेख शहा यांनी औरंगजेब फॅन क्लबचे नेते असा केली. त्याच बरोबर यावेळी महाराष्ट्रात कधी नव्हे येवढा मोठा विजय भाजप युतीचा होईल असा विश्वास व्यक्त केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित शहा यांचा पवारांवर हल्लाबोल
अमित शहा यांच्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली. पवार केंद्रात मंत्री होते. राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी तुम्ही काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांना महाराष्ट्रासाठी आणता आला नाही. उलट मोदींनी खूप मोठा निधी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दिला असेही ते म्हणाले. शरद पवार हे नेहमी खोटं बोलतात. ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे या देशात भ्रष्टाचाऱ्यांचा सरदार जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातली जनता पवारांना कधीही संधी देणार नाही असेही ते म्हणाले. पवारांनी जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. त्यांचा परदाफाश केल्या शिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? ना शिंदे, ना पवार, फडणवीसांनी कोणाचं नाव घेतलं?
मराठा आरक्षणावरूनही सुनावले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यालाही अमित शहा यांनी यावेळी हात घातला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले होते. ज्या वेळी महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण ज्यावेळी शरद पवारांचे सरकार येते त्यावेळी मराठा आरक्षण निघून जाते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण टिकवणारे सरकार हवे की नको असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थितांना विचारला. आरक्षणाला बळ देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जर महाराष्ट्रात पवारांचे सरकार आले तर आरक्षण निघून जाईल असेही शहा यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा उल्लेख अन् औरंगजेब फॅन क्लब
शरद पवारांनंतर अमित शहा यांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला. औरंगजेब फॅन क्लब तुम्हाला माहित आहे का? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला. त्यानंतर हा आघाडीचा क्लब आहे. त्यांचा नेता कोण आहे माहित आहे का असा प्रश्न करत त्यांचा नेता उद्धव ठाकरे आहेत असे शहा म्हणाले. जे लोक कसाबला बिर्याणी देतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. तेच स्वत: ला बाळासाहेबांचे वारस समजतात ते आज काँग्रेस बरोबर आहेत. याची उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहीजे असे अमित शहा म्हणाले. शिवाय हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकत नाही. महाराष्ट्राला फक्त भाजप सुरक्षित ठेवू शकतो असा दावाही त्यांनी या निमित्ताने केला.
आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय यावेळी भाजपला मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार निश्चित बनेल असेही ते म्हणाले. जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.पण आता तो राहाणार नाही. लाडकी बहीण सारखी योजना सरकारने आणली आहे. शिवाय अनेक योजना राबवल्या जात आहे. लोकसभेला जी कसर राहीली आहे ती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरून काढा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार आल्यास देशातील भाजप कार्यकर्त्यांचा हुरूप वाढेल असेही ते यावेळी म्हणाले.