विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मातब्बर उमेदवारां विरोधात तेवढात तगडा उमेदवार मैदानात उतरवण्याची रणनितीही आखली जात आहे. त्यात मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष आहे. या मतदार संघातून मनसेने या आधीच संदिप देशपांडे यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनीही उडी घेतली आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. वरळीकरांची पसंती घड्याळ, पुन्हा एकदा घड्याळ अशी ही बॅनरबाजी आहे. शिवाय संभाव्य उमेदवार कोण असेल याचेही बॅनर इथे लावण्यात आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील एका विधानसभेवर सगळ्यांचे लक्ष आहे ते म्हणजे वरळी विधानसभा. इथं आदित्य ठाकरे हे सध्या आमदार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे देखील इथे निवडणूक लढवणार आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उडी मारली आहे. अजित पवार गटाकडून प्रवक्ते अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्याचे बॅनर वरळी परिसरात लागले आहेत. वरळीत पुन्हा घड्याळ येणार असा आशयाचे बॅनर वरळीत लावण्यात आले आहे. शिवाय पुन्हा घड्याळ. हीच ती वेळ पुन्हा घड्याळ. सामान्य माणसाची पसंती घड्याळ असे या बॅनरवर लिहीण्यात आले आहे. राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे सरचिटणिस नागेश मढवी यांनी हे बॅनर लावले आहे. शिवाय यावर अमोल मिटकरी यांचे कौतूक ही करण्यात आले आहे. ते या मतदार संघात उमेदवार असतील असे संकेतही देण्यात आले आहे.
वरळी मतदार संघ शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र या गडाला सचिन अहिर यांनी सुरूंग लावला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना इथून दोन वेळा विजय ही मिळवला. ते सरकारमध्ये मंत्रीही राहीले आहेत. सध्याची स्थिती मात्र बदलली आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. वरळीत त्यांची चांगली ताकद आहे. राष्ट्रवादीने या जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवारांनी या जागेवर दावा केला आहे. अशा स्थितीत आक्रमक स्वभाव आणि जोरदार वक्तव्य असलेले अमोल मिठकरी यांना मैदानात उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी करत आहे.
एकीकडे आदित्य ठाकरे हे शिवसेनेकडून उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी मनसेने संदिप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. त्यात भर म्हणून अमोल मिटकरीही रिंगणात असतील. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढतीची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळीतून शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना अगदीच छोटी आघाडी मिळाली होती. ठाकरेंच्या मतदार संघात इतकी कमी आघाडी ही ठाकरेंसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे विरोधकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.