जाहिरात

'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर

बदलापूर सारखेच एक प्रकरण घडले होते. त्या प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली होती असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर
मुंबई:

बदलापूर प्रकरणानंतर राज्यातले राजकारण तापले आहे. बदलापुरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला सोडणार नाही असं सांगितलं. शिवाय बदलापूर सारखेच एक प्रकरण घडले होते. त्या प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली होती असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली. ती घटना नक्की कोणती असा प्रश्न विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर नक्की त्याच आरोपीला फाशी केली का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तर याबाबत एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. या संपुर्ण गदारोळात सत्य काय आहे हे आता समोर आले आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन महिन्यात फाशी दिली या वक्तव्यावर जोरदार टिका झाली. त्यांच्यावर चौफेर हल्ला झाला. त्यावर आता शिवसेना शिंदे गटाने एक ट्वीट करत त्या घटनेची सर्व माहितीच समोर मांडली आहे. त्या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला ती पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली होती. इथं एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले होते. शिवाय तिची हत्या ही करण्यात आली होती. ही घटना 2 ऑगस्ट 2022 ला झाली होती. 

ट्रेंडिंग बातमी -  'बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत'

त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 2 ऑगस्टला एफआयआर दाखल करण्यात आला होता. पुढे 3 तारखेला गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या होते. एफआयआर दाखल केल्यानंतर 40 दिवसात तपासही पुर्ण करण्यात आला होता. सहा महिन्यानंतर म्हणजेच 16 मार्च 2023 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोप निश्चिती झाल्यानंतर दोन महिन्यात साक्षी पुराव्याची तपासणी सुरू झाली. ती तारीख होती 12 मे 2023. त्यानंतर 22 मार्च 2024 ला या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लागला. असा दावा शिवसेनेनं केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?

जलदगतीने चालवण्यात आलेल्या खटल्यात आरोपी तेजस दळवीला चार महिन्यांपूर्वी पुणे न्यायलयाने फाशी सुनावली आहे. शिवसेनेने केलेल्या ट्वीटमुळे प्रकरण घडल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी निकाल लागला होता. तर कोर्टात गेल्यानंतर दहा महीन्यात या प्रकरणाचा निकाल लागला होता हे स्पष्ट होत आहे. महायुती सरकारच्या काळात गुन्हेगाराला अभय नाही. आमच्या बहिणी लाडक्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य होणार नाही, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही म्हणजे नाहीच. विरोधकांनी दुर्दैवी प्रकरणाचे राजकारण करणे थांबवावे. न्यायासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com