जाहिरात
Story ProgressBack

दिरा विरूद्ध भावजय मैदानात, धाराशिवचा गड कोण राखणार?

Read Time: 2 min
दिरा विरूद्ध भावजय मैदानात, धाराशिवचा गड कोण राखणार?
धाराशिव:

बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरूद्ध भावजय यांच्यात लढत होत आहेत. अशात आता आणखी एका मतदार संघात दिरा विरूद्ध भावजय मैदानात उतरली आहे. तो मतदार संघ आहे धाराशिव. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं या आधीच ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. अर्चना पाटील या ओमराजेंच्या नात्यानं भावजय लागतात.  त्यामुळे आता धाराशीवच्या मैदानात पाटील विरुध्द निंबाळकर असा सामना रंगणार आहे. 


दोन घराण्यातला संघर्ष 
ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हा संघर्ष धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यासाठी आता नवा राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे रिंगणात आहेत. तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.  त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ही दोन घराणी आता लोकसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा समोरा समोर आली आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य : ओमराजे निंबाळकर फेसबुक पेज


कोण आहेत अर्चना पाटील?  
राज्याचे माजी गृह मंत्री पद्मसिंह पाटील यांची सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून त्या संपर्कात असणाऱ्या नेतृत्वाला महायुतीकडून रिंगणात उतरविण्यात आले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र विजय आमचाच होणार असा विश्वास दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य : अर्चना पाटील फेसबुक पेज


2019 च्या निवडणुकीत काय झालं? 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस कडून राणा जगजितसिंह पाटील असा सामना रंगला होता. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सव्वा लाख मतांनी दणदणीत पराभव केला होता. ओमराजे निंबाळकर यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा अर्चना पाटील हा वचपा काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination