
संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या "कोहम् सोहम्" या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, गायक अजित कडकडे, दिनेश पिळगावकर, रामदास भटकळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री शेलार यांनी अरविंद पिळगावकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत या पुस्तकावर भाष्य करताना हे सांगितले की, हे पुस्तक संगीत रंगभूमीचा, शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत परंपरेचा एक मोठा इतिहास उलघडणारे आहे.
नक्की वाचा - मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का
हे पुस्तक जसे आहे तसेच ते मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींच्या नोंदी ठेवणारे आहे. त्यामुळे हे तरुणांनी वाचावे असा संदर्भ कोश आहे. तर संगीत नाटकांसाठी एक योजनाही या निमित्ताने मंत्री शेलार यांनी जाहीर केली. संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने रवींद्र नाट्यमंदिर सवलतीत देण्याचा निर्णय घेतला असून शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस रवींद्र नाट्य गृहाची 24 सत्र, लघू नाट्यगृहाची 12 सत्र सकाळी 9.30 ते दुपारी 2 या कालावधीत 25 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world