Eknath Shinde Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मेळावा मुंबईत झाला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिंदे यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेत बोलताना त्यांनी आपला पक्षच खरी शिवसेना आहे, हे जनतेनं मान्य केलं आहे असं स्पष्ट केलं. बाळासाहेबांचे विचार खुर्चीसाठी पायदळी तुडवणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी नाक घासून माफी मागावी, अशी टीका शिंदे यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंत्र दिला आहे.
काय म्हणाले शिंदे?
सत्तेची अडीच वर्ष मिळाली. त्यामध्ये एकही मिनिट वाया घालवला नाही. जनतेसाठी काम केलं. हा विजय आपल्याला मिळाला. मायबाप जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांना वंदन करतो, असं शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं.
'खुर्चीसाठी कासावीस नाही'
बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं मोठं गिफ्ट आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी आपल्या सर्वांची पाठ थोपटली असती. या विजयानं आपली जबाबदारी वाढलीय. दुप्पट वेगानं चौपट काम करावं लागेल. त्यासाठी एकनाथ शिंदे तुमच्यासोबत अहोरात्र काम करायला तयार आहे, हा शब्द देतो.
शिवसेनेच्या विचाराबाबत तडजोड होणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी कधीही प्रतारणा होणार नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. खुर्चीसाठी एकनाथ शिंदे कधीही कासाविस झालेला नाही, होणार नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'राज-उद्धव होते जोडीला'...उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचा पोवाडा, नेमकं काय घडलं? Video )
मनगटात ताकद लागते !
आपल्याला कुणी गॉडफादर नाही. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचा मंत्र आणि शिवसेना हे चार शब्द आपले गॉडफादर आहेत. बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची ' घर का ना घाट' का अशी अवस्था झाली. शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. जनतेनंही त्यांचा उरला सुरला नक्शा उतरवला, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना आज वेगानं पुढे जात आहेत. आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार. निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरुन काम करावं लागतं, असा टोला शिंदे यांनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
लोकसभेत खोटा नॅरेटीव्ह पसरवून मतं मिळवली. तरीही शिवसेनेला लोकसभेपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाले. तर विधानसभेत पंधरा लाख मतं जास्त मिळाली. तुम्ही 97 पैकी 20 जागा जिंकल्या. आपल्या शिवसेने 80 पैकी तब्बल 60 जागा जिंकल्या. आता सांगा खरी शिवसेना कुणाची? असं शिंदे या भाषणात म्हणाले.
Narayan Rane:'साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही...' नारायण राणे भावुक का झाले?
नाक घासून माफी मागा...
बाळासाहेंबांचे विचारांचे मारक काय बांधणार स्मारक? असा सवाल शिंदे यांनी केला. बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
कार्यकर्त्यांना मंत्र
'अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, पुरा आसमाँ बाकी आहे'. महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबिज करायची आहे, असा मंत्र शिंदे यांनी यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला. पुढील वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे. बलशाली शिवसेना ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. तेच बाळासाहेबांचं खरं स्मारक ठरेल. शिवसैनिकाला काही अशक्य नाही
काम करो ऐसा एक पहचान बन जाये, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाये
जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी ऐसी जियो की मिसाल बन जाये, हा शेर ऐकवत शिंदे यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला.