जाहिरात

'राज-उद्धव होते जोडीला'...उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचा पोवाडा, नेमकं काय घडलं? Video

Raj Thackeray Povada : शिवसेना उबाठा पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचा पोवाडा वाजवण्यात आला आहे.

'राज-उद्धव होते जोडीला'...उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचा पोवाडा, नेमकं काय घडलं? Video
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचे स्वतंत्र मेळावे मुंबईत होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचा मेळावा अंधेरीत तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील मैदानात होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरेंचं कौतुक

शिवसेना उबाठा पक्षाच्या मेळाव्याला अंधेरीत सुरुवात झाली. या मेळाव्यात सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं म्हणून या मेळाव्यात वेगवेगळे पोवाडे वाजवण्यात आले. यामधील एका पोवाड्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही उल्लेख होता.

'राज-उद्धव होते जोडीला' या ओळीचा समावेश असलेला पोवाडा उबाठा यांच्या मेळाव्यात वाजला. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र असताना घडलेल्या चांगल्या गोष्टींचा शाहिरानं उल्लेख केला होता. शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचं कौतुक असलेला पोवाडा वाजल्यानं त्याची एकच चर्चा सुरु झाली आहे. 

उद्धव ठाकरेंमुळे सोडली होती शिवसेना

राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेत केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू शिवसेनेचं काम करत होते. शिवसेनेच्या महाबळेश्वरमधील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव देखील राज ठाकरे यांनी मांडला होता.

महाबळेश्वरच्या अधिवेशनानंतर शिवसेनेतील पक्षांतर्गत परिस्थिती झपाट्यानं बदलली. त्यानंतर 'विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे' असा आरोप करत राज यांनी 2005 साली शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला. राज यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला विरोध करत शिवसेना सोडली आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.


( नक्की वाचा : Uddhav-Raj Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 'एक है तो सेफ है'ची भूमिका घेणार का? )

'खरा गद्दार घरात बसलाय'

मनसेच्या स्थापनेनंतर राज आणि उद्धव यांच्यातील राजकीय मतभेत आणखी तीव्र झाले. ठाकरे बंधूंनी एकमेकांवर राजकीय टोलेबाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राज यांनी मुंबईतील शिवडी मतदारसंघात झालेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.

शिवडीतील सभेत राज यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेत टीका केली होती. एका माणसाने अख्ख्या पक्षाची वाट लावली.  अनेक लोकं निघून गेले त्यांना म्हणतात हे गद्दार आहेत. अरे, गद्दार तर घरात तिथं बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली.  

या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो आणि नंतर शिंदे बाहेर गेले. पण जो माणूस बाळासाहेंबाना पहिल्यांदा त्रास दिला, त्या माणसाला (छगन भुजबळ) मातोश्रीवर बोलावतो.  बाळासाहेबांना त्रास दिला हे सोडून द्या, त्याचं यांना काहीही देणंघेणं नाही. बाकीचे याचे शत्रू. या सर्व गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे, त्याचं नाव उद्धव ठाकरे,' अशी टीका राज यांनी केली  होती.

ठाकरे बंधू एकत्र येणार?

राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकात शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षाचा धुव्वा उडाला. शिवसेना ठाकरे पक्षाला 20 जागा मिळाल्या. तर मनसेला खातंही उघडता आलं नाही. या पराभवानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी चर्चा आणि कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण, या चर्चेवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यानंतर आता थेट उबाठा पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कौतुक करणारा पोवाडा वाजल्यानं ही सर्व चर्चा सुरु झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com