Eknath Shinde on Raj Thackeray : राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाजूला केलं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, शिवसेना सोडण्याची कारणं, महाविकास आघाडी सरकारनं देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा केलेला प्लॅन यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर उत्तरं दिली आहेत. त्याचबरोबर शिंदे यांनी शिवसेनेतील राज विरुद्ध उद्धव या कालखंडालाही उजाळा दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाळासाहेबांची इच्छा नव्हती
'राज ठाकरे तुमच्यासोबत होते. त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण काय होतं? राज ठाकरे बाळासाहेबांसोबत काम करत होते. त्यांनी 1995 च्या निवडणुकीत बाळासाहेबांसोबत प्रचार केला. त्यांनी पक्षासाठी वातावरण निर्मिती केली. पण, राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली तेंव्हा उद्धव ठाकरे यांची महत्त्वकांक्षा जागृत झाली. तशीच त्यांची मुख्यमंत्री बनण्याचीही इच्छा होती' असं शिंदे यांनी सांगितलं.
'उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांना मांडायला लावला. त्यानंतर त्यांना बाजूला केलं. राज यांनी पक्षासाठी कमकुवत भागात काम करण्याची तयारी दाखवली होती. पण, उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षितता होती. त्यामुळे त्यांना ती देखील जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे ते बाजूला झाले. राज ठाकरेंनी पक्ष सोडावा अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा नव्हती', असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )
राज आमच्यासोबतच
राज ठाकरे महायुतीचा भाग का नाहीत? हा प्रश्न विचारल्यावर ते आमच्यासोबतच असल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी िदलं. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत एकाच व्यासपीठावर होते. आम्ही एकत्र लढत नसलो तरी एकमेकांच्या विरुद्धही लढत नाहीयत. अजूनही वेळ आहे. पुढे पाहा... असं सूचक वक्तव्य शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये केलं.