रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbra News : सध्या सोशल मीडियावर एक वाक्य खूप जास्त व्हायरल होत आहे. 'कैसे हराया...' महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी छुपेपणे आपल्या विरोधकाला कसं हरवलं, असं म्हटलं असेल. मात्र मुंब्र्यातील एका तरुण नगरसेविकेने सार्वजनिक भाषणात विरोधकांना धारेवर धरलं. मुंब्र्यातली MIMची तरुण नगरसेविका सेहर शेख. सध्या सेहरची शहरभर जोरदार चर्चा आहे. सेहरची चर्चा होण्याची दोन मुख्य कारणं. एक म्हणजे 'कैसे हराया' हा सेहरचा डायलॉग आणि दुसरं म्हणजे सेहर शेख म्हणाल्या सगळा मुंब्रा हिरवा करायचाय.
सेहर शेखवर भाजपची टीका...
सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. जितेंद्र आव्हाडांचे मुंब्र्यातले हे निकटवर्तीय. पण आव्हाडांनी शेवटच्या क्षणापर्यंत बाप-बेटीला तिकीटासाठी झुलवलं. अखेर सेहरनं MIM कडून तिकीट मिळवलं, ती जिंकली...आणि तिच्या पॅनेलचे चार उमेदवारही निवडून आले. जिंकून आल्यावर केलेल्या भाषणात सेहर शेख म्हणाल्या आता संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय. त्यावर आता भाजपनं टीका केली आहे. भाजप म्हणतंय...जिहादी लोकं शहरांचा ताबा घेत आहेत, असा प्रयत्न मुंबईत होऊ शकतो, असा पलटवार अमित साटम यांनी केला आहे. मात्र सेहर यांचं म्हणणं आहे, माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा.. म्हणून मी हिरवा म्हणाले.
कुणाचा रंग कुठला यावरुन आता ही नवी लढाई सुरू झाली आहे. त्यामध्ये ठाकरे गटानंही आता उडी घेतली आहे. ठाकरे गटाच्या मुंबईतल्या वॉर्ड ६४ मधून निवडून आलेल्या सबा खान म्हणतायत...मी सेहर शेख यांच्या वक्तव्याशी सहमत नाही.
कोण आहे सेहर शेख? l Who is Seher Sheikh?
- सेहर शेख या मुंब्र्यातल्या तरुण नेत्या
- आधी राष्ट्रवादीचे असलेल्या युनूस शेख यांची ती मुलगी
- सेहर शेख २९ वर्षांच्या आहेत
- त्यांनी मुंबईत विद्यापाठीतून Bachelor in Business Management Studies (BMS) पदवी घेतलीय
- नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून कार वॉशिंग सेंटर नमूद केलाय
- सेहर शेख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत
- त्यांचे इन्स्टाग्रामवर 3 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत
- त्यांचं वक्तृत्वही उत्तम आहे
मुंब्र्यातल्या या तरुण मुलीनं आता रंगांची नवी लढाई सुरू केली आहे. भाजप त्याला जिहादची लढाई म्हणतंय. तर सेहर शेख त्याला झेंड्याची आणि पक्षाची लढाई म्हणतायेत. त्यामुळे आता या रंगांच्या लढाईत मुंब्र्याचं राजकारण कसं बदलणार आणि मुख्य म्हणजे आव्हाडांचं मुंब्र्यात काय होणार याची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world