शुभम बायस्कार, प्रतिनिधी
bacchu kadu morcha : शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रकारच्या मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन असलेल्या नागपुरात (28 ऑक्टोबरपासून) महाएल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी सरकारला देत आक्रमक भूमिका घेतली आहे. कडूंच हे आंदोलन सुरू असतानाच भाजप आमदाराने त्यांच्यावर खळबळजनक लेटरबॉम्ब टाकलाय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या पत्रात मोठे गौप्यस्पोट करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी बच्चू कडूंच्या आंदोलनाला एक वेगळं वळण येण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू यांचा पराभव करणारे अमरावतीच्या अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत या पत्रात मोठे आणि तितकेचं धक्कादायक गौप्यस्पोट केले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून तापलेलं वातावरण या पत्रावरून आणखीनच तीव्र होऊन सरकारविरुद्ध विरोधक असं होणार असल्याचं दिसतंय.
नक्की वाचा - Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट
प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राप्रमाणे, गेल्या काळात महाराष्ट्रात पूरप्रवण स्थिती निर्माण झाली होती. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत देत संपूर्ण ताकद शेतकऱ्याच्या पाठीशी उभी केली होती. मात्र, अशाकाळात विरोधी पक्षांनी आणि बच्चू कडूंनी सरकारच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना त्यांनी मुख्यमंत्र्याप्रती द्वेषपूर्ण भूमिका घेतली. बच्चू कडूवर जोरदार हल्लाबोल करताना प्रवीण तायडे म्हणाले, स्वतःला तथाकथित शेतकरी नेते समजणाऱ्या आणि उच्च प्रतीची जीवनशैली जगणाऱ्या बच्चू कडूच आंदोलन हे सार्वजनिक लोकहिताला बाधा निर्माण करणारे आहे. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुरांना वेठीस धरणारे आहे. कडूंनी ज्यावेळी ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात केली त्यामुळे प्रवासी नागरिक आणि रुग्णवाहिकांना मोठी अडचण झाली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे देखील आल्या असं तायडेंनी पत्रात नमूद केलं.
पराभूत झालेल्या बच्चू कडूला आमदारकी मिळवण्याचे वेध लागले आहेत. त्या भावनेतून वाटेल ती राष्ट्रविरोधी, सरकार विरोधी कृती त्यांच्याकडून सुरू आहे असही तायडे यांचं म्हणणं आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलना आडून नागपुरात राष्ट्रविरोधी संघटना सक्रिय, घुसखोरी होणार
बच्चू कडूंवर गंभीर आरोप करताना प्रवीण तायडेंनी मोझरी येथे कडू यांनी केलेल्या आंदोलनात राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असलेले नेते उपस्थित झाल्याचे म्हटलेय. नागपुरात बच्चू कडूंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या आडून राष्ट्रविरोधी संघटना सक्रिय झाल्या असून त्यांच्याकडून नागपुरात घुसखोरी होण्याची शक्यता बळवली असल्याचा देखील गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. देशाचं मध्यवर्ती ठिकाण, उपराजधानी असलेल्या नागपुरात अनेक महत्त्वपूर्ण कार्यालय आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय, देशाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व त्यांचे कुटुंब वास्तव्याला आहेत. अतिशय संवेदनशील असलेला नागपुरात बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या आडून राष्ट्र विरोधी कृती केली जाणार असल्याची शक्यता देखील प्रवीण तायडे यांनी पत्रात वर्तवली आहे.
राष्ट्रविरोधी लोकांकडून आंदोलनाला रसद
ज्या व्यक्तींचा, संघटनांचा राष्ट्रविघातक कृतीमध्ये यापूर्वी सहभाग आढळून आला आहे, त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत, दहशतवाद्यांसोबत ज्यांचे छायाचित्र पुढे आली आहेत, अशा काही लोकांकडून या आंदोलनाला रसद पुरवली जात असल्याची देखील माहिती मिळत असल्याचे आमदार प्रवीण तायडे यांनी म्हटले. आमदारांना कापून काढा या बच्चू कडूंच्या वक्तव्याला उत्तर देताना प्रवीण तायडे यांनी म्हटलं की, अशी राष्ट्रविरोधात वक्तव्य करून बच्चू कडू यांच्याकडून अंतर्गत कलह माजवण्याची देखील रणनीती आखली जात आहे, त्यामुळे बच्चू कडू यांच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई करावी, त्यांची व या आंदोलनात सहभागी असलेल्या इतर लोकांची गृह मंत्रालयाने तत्काळ चौकशी करावी अशी मागणी देखील प्रवीण तायडे यांची आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
