छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये मतभेद दिसत आहेत. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकाच दिवशी वेगवेळी आंदोलनं केली. मला पक्षात एकटं पाडलं जात असल्याचा आरोप खैरे यांनी केलाय. दुसरिकडं महायुतीमध्ये देखील सर्व काही आलबेल नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघातील प्रकरणावर भाजपानं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव घेतली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे भाजपा आरोप
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये 27 ते 28 हजार दुबार नावं असल्याचा आरोप स्थानिक भाजपा नेत्यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही नावं असल्याचा त्यांचा आरोप आहे. भाजपा नेत्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडंही तक्रार केली आहे. बोगस मतदार कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. प्रशासानानं ते केलं नाही तरी आमचे कार्यकर्ते प्रत्येक मतदारांवर नजर ठेवून आहेत. डबल मतदान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करु, असा इशारा भाजपाच्या नेत्यांनी दिलाय.
काय आहे सत्तार विरुद्ध भाजपा वाद?
अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात सिल्लोड मतदारसंघात जुना वाद आहे. सिल्लोड हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून ज्येष्ठ भाजपा नेते रावसाहेब दानवे पराभूत झाले. दानवे यांचा पराभव सत्तार यांच्यामुळेच झाला, असा आरोप स्थानिक भाजपा नेत्यांनी केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून त्यांनी सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.
( नक्की वाचा : ठाकरे गटामधील मतभेद उघड, वरिष्ठ नेत्याचा एकटे पाडले जात असल्याचा आरोप! )
लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने राज्य मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी, सिल्लोड शहर भाजपा अध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली होती.
अब्दुल सत्तार यांनी वारंवार भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. यावेळीही त्यांनी तेच केले. त्यांच्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाले. त्यामुळेच लोकनेते रावसाहेब दानवे यांना पराभव स्विकारावा लागला असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.