राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार यांची भेट झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात चर्चा पार पडली.
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा शुक्रवारपासून सुरू झाला.या दौऱ्यादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांनी शरद पवारांची भेट घेण्याचा आग्रह धरला होता. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात रामा हॉटेलमध्ये बैठक झाली. बंद दाराआड ही चर्चा झाली असून शरद पवार यांनी आंदोलकांचे म्हणणे या बैठकीत ऐकून घेतले.
याच महिन्यात शरद पवारआणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली होती. या बैठकीतही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान गाठत त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान भुजबळ यांनी, शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी केली होती. 'सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण बिघडलं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वरिष्ठ नेत्याने मध्यस्थी करावी', अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती. मध्यस्तीच्या या प्रस्तावाबाबत विचारले असता शरद पवार यांनीा एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सरकारने जरांगे पाटील यांनी कोणत्या गोष्टींचं वचन दिलं होतं? याबाबत माहिती देणं आवश्यक आहे.
शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर माहिती देताना मराठा समाजाच्या आंदोलकांनी म्हटले की, या बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी, सर्वांनी मिळून तोडगा काढला पाहिजे असं म्हणाले. सरकारने ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही तयार आहोत, असे शरद पवार म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सरकार, विरोधक ,जरांगे पाटील आणि ओबीसी यांच्यात चर्चा झाली पाहिजे. ही चर्चा live झाली पाहिजे असे पवारांनी म्हटल्याचा दावा चर्चेसाठी आलेल्या मराठा आंदोलकांनी केला आहे.