मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत खातंही न उघडणाऱ्या मनसेला सोबत घेण्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलंय, मनसेला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. कारण भाजपाचे आणि राज ठाकरेंचे विचार जुळतात त्यामुळे पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंसोबत युती करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, 'लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. आम्हाला त्याचा फायदा देखील झाला. विधानसभेत आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला
इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले. पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत. मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू.'
( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : 'त्या ' महिलांना वगळणार, 'लाडकी बहीण' योजनेबाबत CM फडणवीसांची घोषणा )
राज यांनी दिला होता पाठिंबा
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी प्रचारसभाही घेतल्या. विधानसभा निवडणूक ते स्वतंत्रपणे लढले. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीममधून पाठिंबा द्यावा अशी भूमिका भाजपानं व्यक्त केली होती. पण, त्यानंतरही शिवसेनेकडून सदा सरवणकर माहीममध्ये लढले. राज ठाकरे यांनी प्रचारसभेत महाविकास आघाडीला प्रामु्ख्यानं टार्गेट केलं. भाजपावर कोणत्याही प्रकारची टीका त्यांनी टाळली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.