लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर महायुतीच्या पारड्यात केवळ दोन जागाच गेल्या. त्यातली एक जागा तर अगदी 48 मतांनी मविआच्या हातून गेली. लोकसभेतील या यशानंतर आता विधानसभेच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्या पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे. काँग्रेस जागा वाटपात आक्रमक झाली आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्याही काही जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे तीन खासदार निवडून आले. मुंबईत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा यासाठी वर्षा गायकवाड या आग्रही आहेत. काँग्रेसकडे मुंबईतून निवडणूक लढण्यास मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे. 36 जागांसाठी जवळपास 200 अर्ज काँग्रेसकडे आले आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबईत 15 ते 18 जागा मिळाव्यात असा आग्रह धरला आहे. या काँग्रेसने चार जागा या 2019 च्या निवडणुकीत मुंबईतून जिंकलेल्या आहेत. काँग्रेसचे चार आमदार मुंबईत आहेत. त्यातले झिशान सिद्धीकी हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मनसेचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, तर्क वितर्कांना उधाण
मुंबईतील 36 जागांवर काँग्रेसने सर्व्हे केला आहे. त्यानुसार 15 ते 18 जागा लढाव्यात अशी पक्षाची भूमिका आहेत. त्यातले काही मतदार संघ हे शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहेत. त्यातल्या मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, चांदिवली, कुर्ला, माहीम, भायखळा हे मतदार संघ काँग्रेसला मिळालेत अशी मागणी केली आहे. हे मतदार संघ शिवसेने काँग्रेससाठी सोडावे अशी काँग्रेसची भूमिका आहे. चांदीवली हा मतदार संघ काँग्रेस नेते नसिम खान यांचा आहे. मागिल निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळी तिथले विद्यमान आमदार दिलीप लांडे हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे. भायखळा मतदार संघासाठी ही काँग्रेस आग्रही आहे. त्यासाठी एकादा मतदार संघ सोडण्याची काँग्रेसची तयारीही आहे.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे दोन आमदार 'हाता' ची साथ सोडणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अर्थ काय?
मुंबई हा शिवसेनेचा गड राहीला आहे. मागिल निवडणुकीत शिवसेनेचे 13 आमदार निवडून आले होते. सध्या ठाकरेंकडे मुंबईतले 5 आमदारचं आहेत. त्यामुळे त्यातल्या काही जागांवरही काँग्रेसचा दावा आहे. मात्र या जागा लढवण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात जागा वाटपावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे. जे आमदार आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले आहेत, त्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तिथे काँग्रेस देखील जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काँग्रेसने जरी या जागांवर दावा केला असला तरी त्या जागा सोडण्यास शिवसेना ठाकरे गटाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे मुंबईतील जागांवर आतापासूनच रस्सीखेच आणि नाराजी नाट्य सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, चांदिवली, कुर्ला, माहीम, भायखळा हे शिवसेनेचे पारंपारीक मतदार संघ राहीले आहेत. मात्र या मतदार संघात काँग्रेसचीही ताकद आहे. अनेक वेळा या मतदार संघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशीच लढत झाली आहे.