जाहिरात

सावरकरांबद्दल प्रेम, सरसंघचालकांचं समर्थन, काँग्रेसला सल्ला! सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रानं खळबळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

सावरकरांबद्दल प्रेम, सरसंघचालकांचं समर्थन, काँग्रेसला सल्ला! सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रानं खळबळ
मुंबई:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यावीर सावरकरांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 'फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स' ह्या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा पुरस्कार केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तत्वज्ञ आणि विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धारासाठी काम केले, असं शिंदे यांनी आत्मचरित्रामध्ये म्हंटलं आहे. 


शिंदे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर अद्याप काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यानं थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी शिंदे यांनी सावकर प्रेमाचं प्रदर्शन करत पार्टी हायकमांडची कोंडी केली आहे. काँग्रेसच्या वाटचालीवरही सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय आत्मचरित्रात भाष्य केलं आहे.काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणली पाहिजे. पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते, असं शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


सुशीलकुमार शिंदे सावरकरांविषयी काय म्हणाले?

25 मे 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळयाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्याने मी त्या कार्यक्रमाला गेलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचे मोठे काम आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस हे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या कार्यक्रमाचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले. देवरस खुर्चीवर बसले आहेत आणि इतर सगळे सतरंजीवर. ते छायाचित्र पाहून एका काँग्रेस खासदाराने असा शेरा  मारला की, RSS सरसंघचालकांच्या पायाशी बसणाऱ्या आणि सावरकरांसारख्यांना वंदन करणाऱ्या काँग्रेस जनांच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. देवरसांना मधुमेह आणि संधिवात हे आजार असल्यामुळे त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं आणि परवानगीही मागितली होती.

सावरकरांना मी पाठिंबा दिला ह्या मुद्यावर मी ठाम राहिलो. जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातला असल्यामुळे सावरकरांच्या या प्रयत्नांचे मला विशेष महत्व वाटते. ते प्रकरण तिथेच संपले, पण मी माझा मुद्दा मांडला.

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )

एकेकदा मला आश्चर्य वाटतं की, सावरकरांचा मुद्दा निघाला की आपण त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का देत असतो ? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला इतर अनेक पैलू आहेत. त्यांच्यातला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का ? वास्तविक सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले.  त्यामुळे त्यांना अनेकदा त्रास सोसावा लागला. सावरकरांबाबतचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं मी मानतो.

शिंदे काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या वाटचालीबाबत देखील त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात मत मांडलं आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.  

मला असेही वाटते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हा आपला नेता असतो, मग तो कोणत्याही राज्याचा असो. आणि आपण प्रदेशाध्यक्षांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. मात्र हे होत नाही. यामागचं कारण मला असं वाटतं की, राजकिय सत्ता आणि मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदांचाच मोह असतो. पण इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की, पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते. ह्याची बरीचशी उदाहरणं आपण अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षात पाहात आहोत,' अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
कसब्यात भाजपाचा उमेदवार कोण? कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर, तर नेते म्हणतात...
सावरकरांबद्दल प्रेम, सरसंघचालकांचं समर्थन, काँग्रेसला सल्ला! सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रानं खळबळ
Satara News Udayanraje Bhosale vs shambhuraj desai over ganpati visarjan miravnuk timing
Next Article
Satara News: रात्रभर डॉल्बी वाजणारच, उदयनराजेंचा पोलिसांना इशारा; शंभूराज देसाईंचंही जशास तसं उत्तर