AAP vs Congress : दिल्लीमध्ये सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी बुधवारी आप नेता अरविंद केजरीवाल हे देशद्रोही असल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाला पाठिंबा देणे आणि त्यांच्यासोबत निवडणूक लढवणे ही चूक असल्याचं त्यांनी सांगितलं. युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशींवर एफआयआर दाखल केलीय.
काँग्रेसनं हल्ला करताच आम आदमी पक्षानं त्याला उत्तर दिलंय. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्त्वानं 24 तासांमध्ये स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केलीय. काँग्रेसनं अजय माकन यांच्यार कारवाई केली नाही तर त्यांना इंडी आघाडीतून बाहेर काढावं, असं आम्ही इतर पक्षांना सांगणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवण्यासाठी काँग्रेसनं भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आतिशी यांचा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे काँग्रेसचं राजकारण?
दिल्लीतील काँग्रेस नेते पूर्वीपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत आहेत. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळा उघड झाल्यापासूनच काँग्रेस नेते केजरीवाल यांना लक्ष्य करत आहेत. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची टीका तीव्र झालीय.
वास्तविक दिल्लीमध्ये काँग्रेसची अवस्था नाजूक आहे. मागील दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. 2013 साली काँग्रेसला 24.67 टक्के मत होते. 2020 मध्ये त्यांचा मताधार 4.63 टक्क्यांवर घसरला. त्याचवेळी आम आदमी पक्षाला 2013 मध्ये 29.64 टक्के मतं होती. त्यामध्ये 2020 साली 53.67 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
काँग्रेसची दिल्लीतील परिस्थिती सुधारण्यासाठी आक्रमक आणि लोकांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याचा देखील पक्षाकडं पर्याय आहेत. पण, त्यामध्ये आम आदमी पक्षाचं नुकसान आहे. कारण, दिल्लीतील काँग्रेसची व्होट बँक आपल्याकडं वळवूनच आम आदमी पक्ष सशक्त बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस भक्कम होणं आम आदमी पक्षाला परवडणारं नाही.
( नक्की वाचा : River Linking : PM मोदींनी केला नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास, कशी होते नद्यांची जोडणी? काय होणार फायदे? )
त्याचवेळी काँग्रेससमोर आपला हरवलेला जनाधार पुन्हा मिळवण्याचं आव्हान आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी अरविंद केजरीवाल भ्रष्ट असल्याचं काँग्रेसला सिद्ध करावं लागेल. त्यामुळेच भाजपा आणि काँग्रेस केजरीवाल भ्रष्टाचारी असल्याचं मतदारांवर बिंवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बड्या नेत्यांना उतरवण्याचं काँग्रेसनं ठरवलंय. त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या जुन्या आणि बंडखोर उमेदवारांना तिकीट दिले जात आहेत. या माध्यमातून काँग्रेस वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाला सत्ताधाऱ्य़ांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका बसेल अशी भीती सतावत आहेत.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )
'आप' नं आगामी निवडणुकीत 16 आमदारांचं तिकीट कापलंय. तर चार जणांच्या विधानसभा मतदारसंघात बदल केलाय. 'आप ' मधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मनिष सिसोदीया यांचा मतदारसंघ देखील बदलण्यात आलाय. 2015 आणि 2020 मध्ये सिसोदीया सहज विजयी झाले होते. पण, 2025 मध्ये तशी परिस्थिती नाही. आम आदमी पक्ष भ्रष्टाचारांच्या आरोपांनी अडचणीत आलाय. भाजपाकडून पूर्वीपासूनच आरोप होत आहेत. त्यातच काँग्रेसनंही 'आप' वर तोच आरोप केलाय. आता या संघर्षात कुणाचा विजय होणार हे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्येच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world