महाराष्ट्र भाजपामध्ये बैठकांना 'जोर', फडणवीस-बावनकुळे दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपामध्ये बैठकांवर जोर दिला जात आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील भाजपाच्या कोअर कमिटीची नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी सोबत बैठक झाली होती. या बैठकीला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीनंतर आठवडाभराच्या आतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाले आहेत. 

भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटीसाठी दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विधानपरिषद निवडणूक संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसंदर्भात ब्ल्यू प्रिंटवरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

भाई गिरकर, रमेश पाटील आणि रामराव पाटील या तीन भाजपा आमदारांचा कार्यकाळ आता संपणार आहे. या जागांसाठी अनेकजण इच्छूक असून त्यावरील अंतिम नावांवर दिल्ली दौऱ्यात शिक्कामोर्तब होऊ शकतं. 

यापूर्वीच्या बैठकीत काय झालं?

भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला. भाजपाचं राज्यात तब्बल 14 जागांचं नुकसान झालं. या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीत झाली होती. या बैठकीत समन्वयाच्या अभावावर भाजपा पक्षश्रेष्ठींनी बोट ठेवले. आता केंद्रीय नेतृत्त्व राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. दिल्लीतील कोअर कमिटीच्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील उणीवांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर विरोधकांना हलक्यात घेऊ नका, असंही पक्षश्रेष्ठींनी बजावल्याची माहिती आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : भाजपा-राष्ट्रवादी युतीचं भवितव्य काय? दिल्लीतील बैठकीत झाला निर्णय )

महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे महाआघाडीचे सरकार ताकदीने स्थापन करायचे आहे. असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं.