Radhakrishna Vikhe Patil Profile : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत मोठ्या बहुमतासह सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळात भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. विखे-पाटील घराणं महाराष्ट्राला नवं नाही. राज्याच्या स्थापनेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या मोजक्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश होतो. राधाकृष्ण विखे-पाटील या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रमुख. मुळचे काँग्रेसी असलेल्या विखे पाटील यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस असा करत आता भाजपामध्ये स्थिरावला आहे. 5 वर्षांपूर्वी प्रवेश केल्यानंतरही पक्षातील पॉवरफुल नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विखे पाटील पॅटर्न
राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांची सहकार महर्षी म्हणून देशाला ओळख आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना त्यांनी नगर जिल्ह्यात सुरु केला. सहकार,समाजकारण ,शिक्षणसंस्था आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात विखे पाटील घराण्याचा नगर जिल्ह्यात प्रभाव आहे. विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारण करता येतं हे राज्याला दाखवून दिलं. त्याचं अनुकरण नंतरच्या काळात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलं. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आज प्रस्थापित असलेल्या अनेक राजकीय घराण्यांची मुळं सहकारामध्येच दडली आहेत.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते पवारांचे विश्वासू, धनंजय मुंडेंचा संघर्षाचा प्रवास )
वडील आणि मुलासाठी पक्ष सोडला
राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 रोजी झाला. त्यांनी आजोबांनी स्थापन केलेल्या प्रवरानगर पब्लिक स्कुलमध्ये शालेय शिक्षण घेतलं. कोपरगावच्याच संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. तसंच राहुरीच्या कृषी विद्यापीठानं त्यांचा मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केलाय.
विखे-पाटील घराणं हे काँग्रेसचं पारंपारिक घराणं. त्यामुळे त्यांनीही युवक काँग्रेसच्या मार्फत राज्याच्या राजकारणाला सुरुवात केली. 1990 च्या दशकात त्यांचं सक्रीय राजकारण खऱ्या अर्थानं सुरु झालं.राधाकृष्ण विखे यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्रीही होते. वडिलांच्यापाठोपाठ राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही काँग्रेसचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केला. युती सरकारच्या काळात ते मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
( नक्की वाचा : भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं )
युती सरकार सत्तेतून गेल्यानंतर काँग्रेसमध्ये परतलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना 2019 साली मुलासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सोडावा लागला. सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुलानंतर राधाकृष्ण यांनीही भाजपाचं कमळ हाती घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
विखे-पवार राजकीय वैर
शरद पवार आणि विखे पाटील घराण्याचं राजकीय वैर राज्यात सर्वांनाच परिचित आहे. वास्तविक शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांनी विठ्ठलसाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात अधिकारी म्हणून काही काळ काम केलंय. शरद पवारांचेही काही शिक्षण प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात झालं आहे. त्यानंतर राजकारणात पवार आणि विखे एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये यशवंतराव यांच्यानंतर शरद पवार आणि शंकरराव चव्हाण हे दोन गट निर्माण झाले. विखे-पाटील यांनी तेव्हा शंकरराव चव्हाण यांना साथ दिली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यानं बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून ती निवडणूक लढणाऱ्या बाळासाहेब विखे यांचा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यशवंतराव गडाख यांनी निसटता पराभव केला.
त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपलं चरित्र्यहनन केल्याचा खटला बाळासाहेब विखे पाटील यांनी गडाख आणि शरद पवार यांच्याविरोधात दाखल केला होता. तो खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. न्यायालयानं विखेंच्या बाजूनं कौल दिला. गडाख यांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली. तर शरद पवारांवरही ठपका ठेवला.
शरद पवारांनी त्या खटल्याचं शल्य मनात कायम ठेवलं असं मानलं जातं. त्यामुळेच 2019 साली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली नगरची जागा सोडण्यास पवारांनी नकार दिला. नगर जिल्ह्यातले विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात हे देखील शरद पवारांच्या जवळचे मानले जातात.
( नक्की वाचा : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का )
मंत्रिपदाचा अनुभव
राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते आजवर मनोहर जोशी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस (पहिली कारकीर्द) आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण, कृषी आणि महसूल ही महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
2019 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांना लगेच मंत्रिपद देण्यात आलं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले नेते होते. राज्य आणि देश पातळीवरील भाजपा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं सहकार क्षेत्रात प्राबल्य आहे. ते लक्षात घेऊन सहकार क्षेत्रातील एक बडा आणि अनुभवी नेता म्हणून भाजपामध्ये विखे पाटील यांचं महत्त्व आहे.
( नक्की वाचा : Exclusive : नाना पटोलेंना कोणती गोष्ट जिव्हारी लागली? नाराज नानांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवली अट )
सेटबॅक आणि दमदार कमबॅक
2024 साली झालेली लोकसभा निवडणूक ही राधाकृष्ण विखे-पाटील यांना मोठा धक्का देणारी ठरली. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांचा नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील राजकारणावर संपूर्ण फोकस केला. राधाकृष्ण आणि सुजय या पिता-पुत्रांनी विधानसभा निवडणूक सर्वशक्तीनीशी लढवली. त्याचा त्यांना फायदा झाला.
आहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागा महायुतीनं जिंकल्या. जिल्ह्यातून भाजपाचे चार आमदार निवडून आले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील संगमनेर मतदारसंघातून पराभूत झाले. नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दमदार कामगिरीमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं योगदान होतं. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांमध्येच त्यांनी दमदार कमबॅक केलं. या कामगिरीमुळेच त्यांना भाजपानं पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली आहे.