सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. दोघांमध्ये लेटर वॉर सुरू झाले होते. आपल्या परवानगी शिवाय बैठका घेवू नये. जर बैठका घ्यायच्या असतील तर त्या आपल्याच अध्यक्षतेखाली घ्याव्यात असं खरमरीत पत्रचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना लिहीले होते. त्याला मिसाळ यांनीही त्याच भाषेत उत्तर देत राज्यमंत्री म्हणून अशा बैठका घेण्याचा आपला अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यासाठी शिरसाट यांची पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले होतं. त्यावादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी यावादास स्पष्ट भूमीका मांडली आहे.
संजय शिरसाट यांनी लिहीलेल्या पत्रावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असं पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करू नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं. मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावं. त्यातील अडचण दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत. सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात, यात कुठलाही संशय नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर त्यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे.
नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण
मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणे हे चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. असं म्हणत त्यांनी भाजपच्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांची बाजू सावरून धरली. पुढे बोलताना ते म्हणाले, पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील, तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नये असं ही ते म्हणाले. किंवा असे निर्णय घेतले तर मंत्र्यांची मान्यता घेतली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सामांजस्य दाखवले पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलले पाहिजे असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.
दरम्यान ठाकरें बंधुंच्या एकत्र येण्यावर ही त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आनंदाची बाब आहे, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे. यात राजकीय का पाहता. आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही असं ही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या मनातलं काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही दिसेल. मात्र काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही असं बोलत ठाकरेंना फडणवीसांनी चिमटा काढला.