सुजीत आंबेकर
विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election Result 2024) महायुतीला दणदणीत विजय मिळाला. या विजयानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जाऊ लागला. ईव्हीएममध्ये गडबड (EVM Hacking Allegation) केल्याशिवाय महायुतीचा इतका मोठा विजय होणं शक्य नाही असा आरोप विरोधकांनी होता. ईव्हीएम हॅक करता येत नाही असे निवडणूक आयोगातर्फे वारंवार सांगण्यात आले आहे. तरीही ईव्हीएमवर संशय घेण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. यामुळे भाजपच्या एका नेत्याने ओपन चॅलेंज दिले आहे. महाराष्ट्रातील जी व्यक्ती ईव्हीएम हॅक करून दाखवेल त्याच्या नावावर माझी संपूर्ण प्रॉपर्टी करेन असे आव्हान या भाजप नेत्याने दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माढ्याचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी 'ईव्हीएम हॅक होते' असा दावा करणाऱ्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर शंका घेत आरोप केला होता. जानकर यांनी दावा केला होता की, महाराष्ट्रातील 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये गडबड झाली आहे. या गडबडीची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते. जानकर यांना उत्तर देताना रणजीतसिंह निंबाळकर यांनी म्हटले की, ईव्हीएमबाबत आरोप करणारे उत्तम जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांना परवाच फोन करून मी सल्ला दिला होता की उत्तमराव महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात संभ्रम निर्माण करायचं सोडून द्या. जर तुमच्याकडे ईव्हीएम मशीन हॅक करण्याची यंत्रणा असेल तर निवडणूक आयोगाचे चॅलेंज स्वीकारा. ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. तसे झाल्यास मी माझी जितकी असेल ती सगळी जानकरांच्या नावावर करायला तयार आहे. निंबाळकर यांनी पुढे म्हटले की, जानकरच नाही तर महाराष्ट्रातील जी व्यक्ती ईव्हीएम हॅक करेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे.
नक्की वाचा : EVM हॅक करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, निवडणूक आयोगाचंही स्पष्टीकरण
निंबाळकर यांनी म्हटले की मतदारांनी आपण दिलेले मत योग्य व्यक्तीला गेले आहे की नाही ही व्हीव्हीपॅट स्लीपद्वारे दिसते. मात्र केवळ पराभवामुळे गैरसमज निर्माण करण्याचे काम शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरू असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला आहे. खोट्या अफवाच्या जीवावर जगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बंद करावे, ईव्हीएमबाबत निराधार बोलण्यापेक्षा जनमानसामध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world