महायुतीला दुसरा धक्का, मोहिते पाटलांच्या प्रवेशाने निंबाळकरांसाठी निवडणूक किती आव्हानात्मक?

धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक अधिक रंजक होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
माढा:

धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक अधिक रंजक होणार आहे. माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीतर्फे रणांगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे. महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश करीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला. त्यामुळे दक्षिण अहमदनगरनंतर माढ्याची निवडणूक महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

निंबाळकरांविरोधात धैर्यशील मोहिते पाटील मैदानात
धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहे. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. याशिवाय संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील घराण्याचं स्थानिक कनेक्ट तगडा आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं. आता पुन्हा एकदा तिच स्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयसिंह मोहिते पाटील यांची साथ आहे. सोलापूरच्या राजकारणातील मोहिते पाटील यांचं वर्चस्व निर्माण करण्यामागं विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठा वाटा आहे.

सुप्रिया सुळे यांना बारामतीची जागा सोडल्यानंतर शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवली आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे ती जिंकण्यात पवारांना यश आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे निंबाळकरांचा करारी बाणा की मोहिते पाटलांचं जिल्ह्यावरील नियंत्रण, काय बाजी मारणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 

दुसरीकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या गडावर भाजपचा झेंडा फडकवला होता. मात्र आता मोहिते-पाटील विरोधात असल्याने निंबाळकरांसमोरील आव्हान वाढलं आहे. शरद पवारांना नडणारा नेता म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांची ओळख असली तरी आता मात्र त्यांनी स्थानिक पातळीवर मोट बांधणी सुरू केली आहे. निंबाळकरांकडून माढ्याचे शिंदेबंधू, करमाळ्यातील बागल गट यांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरले आहेत.