
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी अखेर वडीलांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वेळी भाग्यश्री यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. या भाषणात त्यांनी वडीलांची साथ का सोडली हे सांगताना आपलं आक्रमक रूप दाखवलं. शिवाय अजित पवारांनाही चांगलाच आरसा दाखवला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्याकडे पाहातच राहीले. धर्मरावबाबा आत्राम वाघ आहेत, तर मी वाघीण आहे. आणि वाघीण जास्त घातक असते. त्यामुळे वाटेला जाल तर खबरदार अशा शब्दात त्यांनी वडीलांना आव्हान दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाबांना सोडण्याची वेळ त्यांनीच आणली असा गौप्यस्फोट यावेळी भाग्यश्री आत्राम यांनी केला. या मतदार संघात काहीच काम झालं नाही. लोकांच्या समस्या वाढत आहेत. याबाबत मी वारंवार बाबांना विचारत होती. पण त्यांना ते आवडत नव्हते. तेव्हापासून आपले खच्चीकरण करणे सुरू झाले. मी त्यांना प्रश्न विचारणे हे त्यांना चूक वाटत होते. पण इथल्या जनतेसाठी प्रश्न विचारणे ही जर का चूक असेल तर अशी चूक मी नेहमी करेन अशा शब्दात त्यांनी आपल्या वडीलांना ठणकावलं आहे. आता माझी जात काढली जात आहे. पण गडचिरोली जिल्हा परिषदेची अध्यक्ष बनवताना जात दिसली नाही का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. शिवाय मी आहेरीची लेक आहे असंही बोलून दाखवलं.
ट्रेंडिंग बातमी - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
मी घर फोडलं नाही. स्वत:हून शरद पवारांकडे गेले. इथल्या जनतेसाठी हा निर्णय घेतला असंही भाग्यश्री आत्राम यावेळी म्हणाल्या. इथल्या मंत्र्यांना इथल्या जनतेसाठी वेळ नाही. ते फक्त इथे येतात नंतर निघून जातात. ही संपूर्ण मतदार संघ मी सांभाळला आहे. लोक जोडली आहेत. पण त्यांनी कधीही लोकं जोडली नाहीत. ज्यावेळी बाबांना नक्षलवाद्यांनी पकडलं होतं त्यावेळी शरद पवारांच्या प्रयत्नाने त्यांची सुटका झाली होती. हे आमच्या घरावर असलेले उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
मुलगी मतं मागायला आली तर तीला नदीत फेकून द्या असे वक्तव्य धर्मरावबाबा आत्राम यांनी केले होते. हे वक्तव्य भाग्यश्री यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. हे वक्तव्य त्यांनी अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षां समोर केले. मात्र त्यांना त्यावर कोणीही काही बोलले नाही. पण बाबांनी केलेल्या टिकेला मी आशिर्वाद म्हणून स्विकारते. मी त्यांना काही प्रत्युत्तर देणार नाही. पण त्यांनी केलेली भाषा किती योग्य होती हे जनतेने ठरवावे असंही त्या यावेळ म्हणाल्या. शिवाय माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. बाब म्हणतात मी वाघ आहे. तर मी वाघीण आहे. वाघीण जास्त घातक असते. त्यामुळे वाटेला जावू नका असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
ट्रेंडिंग बातमी - एमआयएम मविआचं चाललंय काय? दानवे-जलील यांचे दावे प्रतिदावे
अजित पवारांनाही त्यांनी यावेळी खडे बोल सुनावले. घर फोडू नका असा सल्ला अजित पवार मला देत होते.पण तुम्ही शरद पवारांना सोडलं तेव्हा घर फोडत आहोत, हे तुमच्या लक्षात आलं नाही का अशा प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला. शिवाय तुम्हीच आमच्या पक्षात आता या असे आवाहन की त्यांनी अजित पवारांना केले. मागिल निवडणुकीत अजित पवारांकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिकीटाची भिक मागायला आलात का? अशा शब्दात अपमान केला होता याची आठवणही त्यांनी सांगितली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world