महाविकास आघाडीच्या नेत्यांशी युती करण्याबाबत माझी चर्चा झाली आहे असा दावा एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. शिवाय ही चर्चा मुंबईत झाली असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यांचा हा दावा शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोडून काढला आहे. जलली यांची कोणत्या नेत्या बरोबर चर्चा झाली हे त्यांनी जाहीर करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे. शिवाय अशा चर्चा कुठेही आणि कधीही होत नसतात असा टोलाही त्यांनी जलील यांना लगावला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांसोबत आघाडीत येण्याची चर्चा झाली असा इम्तियाज जलील यांचा दावा आहे. ही चर्चा सविस्तर झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तुम्हाला किती जागा हव्या आहेत याबाबत देखील मला विचारण्यात आले.ही गुपचूप बैठक होती.आधी तुम्ही स्पष्ट करा, आम्हाला सोबत घेणार आहे का आणि त्यानंतर आम्हाला किती जागा हव्या आहेत याबाबत सांगू असे मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले असल्याचे जलील म्हणाले. तसेच आमचं काही नाही झालं तर कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली, भेटण्यासाठी आलेले नेते कोणत्या गाडीतून आले, आम्ही कोणत्या रूममध्ये चर्चा केली याबाबत सर्व काही सांगेन असेही जलील म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - बदलापूरनंतर नालासोपारा हादरलं! 10 वर्षांच्या चिमुरडीबाबत घडला भयानक प्रकार
मात्र इम्तियाज जलील यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. त्यांची महाविकास आघाडीतील कोणत्या नेत्यांशी बैठक झाली त्याचं नाव जलील यांनी जाहीर करावं असे आवाहन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जलील यांना केले आहे. तर आमची बैठक दानवे यांच्या पेक्षा मोठ्या नेत्यांशी झाली. दानवे यांनी आपल्या नेत्यांना विचारावं जलील यांच्यासोबत बैठक झाली का?, तसेच उद्धव ठाकरे यांनीच याबाबत खुलासा करावा असे जलील म्हणाले.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आला नसल्याचा आरोप होता. त्यातच मुस्लिम मतदारांनी ठाकरे गटाला लोकसभेत मते दिल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवार दिले जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विधानसभा निवडणुकीत निवडून येत असणाऱ्या मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world