
राज्यपालांच्या अभिभाषणावरिल चर्चेवेळी विधानसभे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. चर्चवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट राज्यपालांनाच लक्ष्य करत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या बोलण्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी राज्यपालांवर हेतूआरोप केले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे कामकाजातून काढून टाकावे असं भातखळकर म्हणाले. त्याच वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप करत विरोधक पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत असं विखे पाटील म्हणाले. त्यानंतर जाधव आणि विखे यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले. शेवटी तालिका अध्यक्षांना यात हस्तक्षेप केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भास्कर जाधव यांनी भाषणाच्या सुरूवातीपासून आपला रोख राज्यपालांवर ठेवला होता. राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यपाल हे जवळपास 60 वेळा माझं सरकार माझं सरकार असं बोलले. पण हे तुमचं सरकार कसं झालं असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. राज्यपाल हे घटनात्मकपद आहे. त्याचा सन्मान राखला गेला पाहीजे. राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे असू शकतात. पण त्यांनी तसे वागायचे नसते. हे घटनात्मक संकेत आहेत. असं जाधव यांनी म्हटलं. शिवाय राज्यपालांच्या भूमीकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला. नव्या सरकार स्थापने वेळी राज्यपालांनी स्वत:हून मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी का निमंत्रित केलं नाही असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय शपथविधीची अधिसुचनाही काढली गेली नव्हती, असं ते म्हणाले. त्यामुळे राज्यपालांना गृहीत धरलं गेलं होतं का अशी विचारणाही त्यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, थेट महायुतीवर निशाणा
भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप नोंदवला. जाधव हे राज्यपालांवर आरोप करत आहेत. त्यांना असे आरोप करता येणार नाहीत. ते एक घटनात्मकपद आहे. त्यामुळे जाधव यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनीही कामकाजातून काढून टाकले जाईल असं निर्देश दिले. पण त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. असं कसं कामकाजातून काढून टाकता येईल. मी काय आक्षेपार्ह बोललो आहे. मी काय असंसदीय बोललो आहे अशी विचारणा यावेळी भास्कर जाधव यांनी केली.
त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तालिका अध्यक्षांच्या मदतीला धावू आले. भास्कर जाधव हे जेष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीची भाषा वापरणे योग्य नाही. त्यांचा जो काही पराभव झाला आहे, त्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. यावर अध्यक्षांनीही आपण त्यांचे वक्तव्य तपासून योग्य तो निर्णय घेवू असं सांगितलं. पण अध्यक्षांनी एकदा निर्णय दिला तर त्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे त्यांचे वक्तव्य काढून टाकण्यात यावे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
या गोंधळात अध्यक्षांनी भास्कर जाधव यांनी आपले म्हणणे दोन मिनिटात संपवावे असं सांगितलं. मात्र दोन मिनिटात संपवा असं तुम्ही कसं सांगू शकता. आमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे आम्ही बोलणार. तुम्ही आमचा आवाज बंद करू शकत नाहीत असं त्यांनी अध्यक्षांना सांगितलं. त्यावर अध्यक्षांनी तुम्ही तुमचं म्हणणं मांडावं असं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर भास्कर जाधव यांनी आपले मत मांडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world