राज्य विधीमंडळाच्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवार, 21 डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत या प्रस्तावाला उत्तर दिलं. शिंदे यांनी या भाषणात विरोधकांना लक्ष्य केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवर देखील टोलेबाजी केली.
काय म्हणाले शिंदे?
पूर्वी तूम लडो मैं कपडे संभालता हूं अशी पद्धत होती. आता, अंबादास तूम लडो मै बुके दे के घर जाता हूं अशी परिस्थिती आहे, असा चिमटा शिंदे कुणाचंही नाव न घेता काढला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमच्या लोकाभिमूख कारभारावर जनतेनं पसंतीची मोहोर उमटवली. त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार. आमची जबाबदारी वाढली आहे. नवीन सीरिज सुरु झाली आहे. नव्या मालिकेची सुरुवात नागपूरच्या ग्राऊंडवर झाली आहे. नागपूरचे मुख्यमंत्री आता आमचे कॅप्टन आहेत. जनतेला दिलेली आश्वासन पाच वर्षात पूर्ण करु. आम्ही अडीच वर्षात पाचच नाही तर त्यापेक्षा जास्त काम केलंय. महायुतीनं सुरु केलेल्या योजनांपैका कोणतीही योजना बंद होणार नाहीत. येत्या काळात नव्या योजना सुरु केल्या जातील, असं शिंदे यांनी सांगितलं.
बडी-बडी हस्तीयां डूब जाती है
हिवाळी अधिवेशनात विरोधक गारठलेला दिसला. कारण, जनतेच्या प्रेमाची उब आम्हाला मिळाली. या दारुण पराभवानंतर विरोधकांच्या कार्यपद्धतीमध्य़े बदल होईल, अशी आशा होती, पण तसंच झालं नाही. तुफान मे कश्तियां और घमंड मे बडी-बडी हस्तीयां डूब जाती है, असा टोला शिंदे यांनी कुणाचंही नाव न घेता विरोधकांना लगावला.
( नक्की वाचा : Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले... )
या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं. हे यश जनतेनं दिलंय. लाडक्या बहिणींनी दिलंय, लाडक्या भावांनी दिलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय. सर्वांनी दिलंय. हा EVM चा घोटाळा नाही. खोटे-नाटे आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकवण्याच्या ऐवजी जनतेचे प्रश्न तुम्ही मांडाल अशी अपेक्षा होती, असं शिंदे यांनी यावेळी बोलताना सुनावलं.
अधिनेशनात मतदारसंघाचे, राज्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी असते. पण, त्यांनी विधिमंडळांच्या पायऱ्यांवर आणि मीडियासमोर बोलण्यास धन्यता मांडली. आम्ही विरोधकांच्या प्रश्नांना यापूर्वी कामातून उत्तर दिलंय. यंदाही आरोपांना कामातून उत्तर देऊ. जनतेला काम करणारे लोकं आवडतात. शिव्या शाप देणारे नाही. गेली अडीच वर्ष दोन्ही सभागृहातील एकही दिवस सरकारवर आरोप केल्याशिवाय गेला नाही, पण काम करणाऱ्यांना सरकार साथ देते आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवते हे निवडणूक निकालांवरुन सिद्ध होते.
काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला तो कुणामुळे झाला ते पाहा. विकासकामांमध्ये स्पीड ब्रेकर लावणारे, योजना बंद करणारे कोण होते? महाराष्ट्रविरोधी कोण होते हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. अडीच वर्षात बंद पडलेलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. ते प्रकल्प सुरु झाले. आम्ही स्थगिती उठवून प्रकल्पांना चालना दिली. आम्हाला कमी कार्यकाळ मिळाला पण, आमचं काम विक्रमी झालं.
( नक्की वाचा : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ काय? )
देवेंद्रजी आणि मला अडकवण्याचा प्रयत्न
आणखी बरीच काम करायची आहेत. गुन्हेगारी प्रश्नांवर आत्ताची आणि महाविकास आघाडी सरकार कार्यकाळातील आकडेवारी आमच्याकडं आहे. दर लाख लोकसंख्येमागे क्राईम रेट पाहिला तर महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक लागतो. मविआच्या गृहमंत्र्यांना वसुली प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं. साधूची हत्या झाली तर सरकार बघ्याच्या भूमिकेत होतं. बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीचे उदात्तीकरणही मविआच्या कार्यकाळात झालं.
आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अनेक मंत्री होते. देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचे प्रयत्न झाले. त्याचे पुरावे आहेत. पोलीस यंत्रणा त्यावेळच्या सरकारच्या प्रमुख मंडळींनी दुरुपयोग केला. मला वस्तुस्थिती माहीती आहे, मी त्या सरकारमध्ये होते, असं शिंदे यांनी सांगितलं.
कितीही मोठा गुन्हेगार असला, तो कुणाच्याही जवळचा असेल तरी त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. हे सामान्यांचं सरकार आहे. मविआच्या कार्यकाळात मलाच जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान सुरु होतं, असा आरोप त्यांनी केला.