एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशी भाषा करीत देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभेत महायुतीला मिळालेल्या भव्य यशानंतर आज पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - एकनाथ शिंदेंना नाराज आमदार दणका देणार? ठाकरेंच्या वक्तव्याने नागपूरचं वातावरण तापलं
उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आरपारची भूमिका घेणाऱ्या ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. ही भेट केवळ अभिनंदनापूरती नसून यामागे अनेक अर्थ असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने अद्याप विरोधी पक्ष नेतेपद कोणालाही मिळालेलं नाही. उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेता भास्कर जाधवांनी विरोधी पक्ष नेतेपदाची नियमावली समजून घेणारं पत्र विधिमंडळाला पाठवलं होतं. विरोधी पक्ष नेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. (मात्र मविआमध्ये अद्यापही यावर एकमत झालेलं नाही)
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी अनेकदा फडणवीसांविरोधात टोकाची वक्तव्यं केली होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन करून निमंत्रण दिलं होतं. मात्र ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना ट्विट करून शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र ठाकरेंनी सार्वजनिकपणे फडणवीसांना शुभेच्छा देणं टाळलं.
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 17, 2024
ह्यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार… pic.twitter.com/rM7EpuTgVu
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांनी महाराष्ट्रातील बिघडलेली राजकीय संस्कृती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता ठाकरेंकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
शरद पवार हे राजकीय वातावरणात सर्व शक्यता खुल्या ठेवतात. अगदी गरज लागली तर फोन करून बोलण्याचीही तयारी दर्शवतात. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीसांमधील कटुता वाढल्याचं दिसतंय. तो दूर करण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांनी भेट घेतली असावी असंही म्हटलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world