सुजित आंबेकर
महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. आधी देवेंद्र फडणवीसांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर प्रतिक्षा होती ती मंत्रिमंडळ विस्ताराची. तो ही विस्तार नागपुरात झाला. ज्यांना संधी मिळाली ते खूश झाले. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज झाले. मंत्री झालो आता खाते कोणते मिळणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. त्यामुळे खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण राज्यातला एक असा जिल्हा आहे त्याला सर्वात जास्त मंत्रिपदं मिळाली आहे. त्यामुळे या त्या मंत्र्यांना कोणते खाते मिळते या पेक्षा त्यांच्या पैकी कोण पालकमंत्री होतो याचीच चर्चा आणि उत्सुकता जिल्ह्यात आहे. तो जिल्हा म्हणजे सातारा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील याचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दोन दिवसांत खाते वाटप होणार आहे. यामध्ये कोणाला कोणते खाते मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. मात्र याचबरोबर चौघांपैकी कुणाच्या गळ्यात साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची माळ पडते, याकडेही साताराकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - संतोष देशमुख हत्या! आरोपी बरोबर काय संबंध? धनंजय मुंडे पहिल्यांदाच थेट बोलले
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्याला महायुतीने विधानसभा निवडणुकीत सुरूंग लावला. महाविकास आघाडीच्या आठही आमदारांचा पराभव करत महायुतीने आपला झेंडा रोवला. या निवडणुकीत भाजपचे चार, अजित पवार गट दोन व शिवसेना शिंदे गटाचे दोन असे आठ आमदार निवडून आले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाला भगदाड पडल्यामुळे सातारा जिल्ह्याचा मंत्रीपद वाटपात वरचष्मा राहिला आहे. एक उपमुख्यमंत्री व चार मंत्री सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत.
रविवारी नागपूर येथील राजभवन लॉनवर सातारा जिल्ह्यातील सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे सातारकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, थेट महायुतीवर निशाणा
जिल्ह्यातील चार मंत्र्यांना नक्की कोणते खाते मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या नेत्याला वजनदार खाते मिळावे अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वजनदार खाते मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या वरिष्ठांकडे शब्द टाकला आहे. मात्र त्याचबरोबर सातारच्या पालकमंत्री पदाबाबतही उत्सुकता आहे शंभूराज देसाई पुन्हा पालकमंत्री होणार की भाजपचे चार आमदार असल्याने शिवेंद्रराजेंना पालकमंत्री केले जाणार की अजितदादांचा आग्रह म्हणून मकरंद पाटील यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world