एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के दिले आहेत. आधी त्यांनी आमदार आपल्या बाजूने केले. त्यानंतर नगरसेवक ही हळूहळू शिंदेंच्या गोटात आले. जिल्हाप्रमुख ही शिंदेंनी आपल्याकडे खेचले. एकएक नेता आणि कार्यकर्ता शिंदेंनी आपल्याकडे घेण्याचा जणू काही धडाका लावला आहे. त्यात आता मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे जवळपास 5 खासदार हे शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. हे पाच खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसे झाल्यास हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पिछेहाट झाली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चारीमुंड्या चित केले. त्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ठाकरे गटाच्या एकएक नेता आणि कार्यकर्ता आपल्याकडे खेचण्याच धडाका लावला. मुंबई महापालिकेतील जवळपास 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवक त्यांनी आपल्या गोटात खेचले आहेत. जिल्हा प्रमुखही शिंदेंनी आपल्याकडे घेतले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचं काम शिंदेंनी केलं आहे.
त्यात आता ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. त्यातले जळपास पाच खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. त्यामुळे सहाव्या खासदाराला ही त्यांनी संपर्क केल्याचं बोललं जातय.
लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याचं विश्वसनीय नेत्यांची माहिती आहे. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता ठाकरे गटाकडूनही काळजी घेतली जात आहे. जाणाऱ्या खासदारांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहे. त्याला आता किती यश येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान ते पाच खासदार कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे. ठाकरे गटाला शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत मात्र शिंदे गट आहे.