अमजद खान, प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्याचवेळी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजपामध्ये वाद पेटला आहे. भाजपा नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी खड्ड्यात मॅरेथॉन भरवली, अशी खोचक टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं केली. त्याला भाजपनं उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खड्ड्यांची टक्केवारी कोणी खाल्ली? आमच्या समाजाला खड्ड्यात टाकले. पदवीधर मतदार संघात शिवसेनेने आमचे काम केले नाही. आधी कल्याण शीळ रस्ता करा नंतर आमच्या नेत्यावर बोला. आमच्या नेत्यावर बोललला तर खपवून घेणार नाही असा सज्जड दम भाजपने शिवसेना नेत्याना दिला आहे.
भाजपने कल्याण डोंबिवली, अंबरनाथमधील पाच विधानसभेच्या जागांवर दावा ठोकला आहे. तर शिवसेनेने देखील आपला दावा ठोेकत भाजप नेत्यांवर प्रत्यक्ष पणे टिका करण्यास सुरुवात केली. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केली. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यातर्फे डोंबिवलीत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेवर टिका करताना शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी घणाघाती टिका केली. ही मॅरेथॉन खड्ड्यात भरविली गेली आहे. असा त्यांनी आरोप केला.
( नक्की वाचा : )
दीपेश म्हात्रे यांच्या आरोपाला भाजप पदाधिकरी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब आणि जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कल्याण ग्रामीण मधील 27 गावात अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यात खड्डे पडले. ते बुजविले गेले नाही. या खड्यांची टक्केवारी कोणी खाल्ली. हे काम कोणामुळे रखडले आहे. तुुम्ही आधी कल्याण शीळ रस्ता करा. नंतर रविंद्र चव्हाण यांच्यावर टिका करा, असं त्यांनी उत्तर दिलं.
मुंबई गोवा महामार्गावरुन शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी मंत्री चव्हाण यांना डिवचले होेते. इतकेच नव्हे तर आमच्या समाजाला खड्ड्यात टाकले. कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे काम शिवसेने केले नाही. आमच्या नेत्यावर टिका केली तर खपवून घेणार नाही. आरे चे उत्तर कारे ने दिले जाईल, असं भाजपा नेत्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही बाजूत सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीत वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.