
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे पत्र पाठविले आहे. या पत्रात अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधाऱ्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरातील नागरिकांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम रुरकीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपविले आहे. या अभ्यासातून पूर परिस्थितीबाबतचा साद्यंत माहिती समजून घेता येणार आहे. याबाबतच अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही, तोवर या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. कर्नाटक शासनाचा अलमट्टी जलाशयाची उंची 519.6 मीटरवरून 524.256 करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी पत्रात केला आहे. अशी उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षीच्या पूरपरिस्थितीत आणि त्यामुळे नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भितीही व्यक्त केली आहे.
नक्की वाचा - Kalyan News: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण
अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम नद्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर झाला आहे. यामुळे पुराचे पाणी ओसरण्याची गती संथ झाली आहे. याशिवाय बंधाऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचू लागला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.अलमट्टी धरणाची जलाशय पातळी सहा मीटरने वाढविण्याचा कर्नाटक शासनाचा निर्णय आहे. यामुळे कृष्णा नदीतही या काळात सातत्याने सहा मीटर पाणी थांबणार आहे. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर आणि भयावह होईल. यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना, तसेच पिकाऊ शेत जमिनीला फटका बसणार आहे.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
या सर्वांचा विचार करता, दोन्ही राज्यातील कृष्णा नदी काठच्या गावांचा आणि नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या जिविताचे, मालमत्तेचे आणि उदरनिर्वाह साधनांच्या रक्षणाचा उपाय म्हणून अलमट्टी धरणाच्या उंची (पूर्ण जलाशय पातळी) वाढविण्याच्या निर्णयाचा कर्नाटक शासनाने पुनर्विचार करावा, याकरिता त्यांना निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world