जाहिरात
This Article is From Mar 22, 2024

अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? काय आहेत नियम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? हे समजून घेण्यासाठी NDTV नं तिहार जेलमधील माजी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात? (फाईल फोटो)

नवी दिल्ली:

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीनं अटक (Arvind Kejriwal Arrest By ED) केली आहे. या कारवाईनंतरही केजरीवालच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. ते जेलमधून कामकाज करतील, असं आम आदमी पक्षानं स्पष्ट केलंय. केजरीवाल सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्री आतिशी यांनी याबाबतची घोषणा केलीय. त्यानंतर अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात का? हे समजून घेण्यासाठी NDTV नं नवी दिल्लीतल्या तिहार जेलमधील माजी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी केजरीवाल जेलमधून सरकार चालवणं किती शक्य आहे? याबाबत माहिती दिली आहे.

जेलमधून सरकार चालवणं कितपत शक्य?

तिहार जेलमधील माजी अधिकाऱ्यानं सांगितलं की,

'जेलमधील नियमानुसार आठवड्यातून दोन वेळाच घरातील सदस्य, मित्र किंवा अन्य व्यक्तींना भेटता येतं. केजरीवाल यांना आठवड्यातून दोन वेळा भेटण्याची परवानगी मिळाली तर सरकार चालवणं शक्य नाही. जेलच्या नियमाप्रमाणे एखाद्या जागेला कारागृह घोषित केलं जाऊ शकतं. घरालाही जेल म्हणून घोषित करता येतं. 'हाऊस अरेस्ट' हे यामधील एक उदाहरण आहे. प्रशासकाला (LG) याबाबतचा अधिकार आहे.

त्यांनी पुढं सांगितलं की, सुब्रतो राय सहारा प्रकरणात हे घडलं आहे. त्यावेळी कोर्टानं कॉम्प्लेक्सलाच जेल घोषित केलं होतं. तसं घडलं तर कोणत्याही अडचणींशिवाय अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतील. पण, याबाबत परवानगी मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे. तुरुंग प्रशासकाची भूमिका यामध्ये महत्त्वाची असते. खासदार किंवा आमदारांना जेलमधून काम करता येईल असा कोणताही नियम नाही. मुख्यमंत्रीपद हे खूप लांबची गोष्ट आहे. एखाद्या जागेचं रुपांतर तात्पुरत्या कारागृहात करणे हे प्रशासकाच्या (LG) परवानगीनंतरच शक्य आहे.  

तिहार जेलमध्येच मुख्यमंत्र्यांना ठेवलं तर तिथून सरकार चालवणं अवघड आहे. कारण तिथं सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. एखाद्या इमारतीला विशेष कारागृह घोषित केलं तरच हे शक्य होईल. कारण सामान्य असो वा व्हिआयपी कोणत्याही कैद्याला आठवड्यातून दोन वेळाच इतरांना भेटता येतं. यापूर्वी B Class आणि C क्लास हे प्रकार होते. पण, आता ते रद्द करण्यात आले आहेत, असं या माजी अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com