जाहिरात
Story ProgressBack

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, 7 टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी निकाल

Election 2024 Dates: सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जून रोजी समाप्त होणार आहे. नवी लोकसभा त्यापूर्वी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.

Read Time: 3 min

ECI to Announce 2024 Election Date : निर्वाचन आयोग ने लोकसभा चुनाव की तारीखों का ऐलान किया.

मुंबई:

राष्ट्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) च्या तारखांची घोषणा केलीय. यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) 4 जून रोजी जाहीर होईल. निवडणूक आयोगानं चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केलीय. 

लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होईल. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 102, 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 89, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात 94, 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 96, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 आणि एक जून रोजी सातव्या आणि अंतिम टप्प्यात 57 जागांवर मतदान होणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

 लोकसभेसोबतच चार राज्यातील विधानसभा निवडणुकाही होणा आहेत. आंध्र प्रदेशातील 175 जागांवर 13 मे रोजी मतदान होईल. अरुणाचल प्रदेशच्या 60 आणि सिक्किममधील 32 जागांवर 19 एप्रिल रोजी तर ओडिशामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमधील 26 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे.

सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जून रोजी समाप्त होणार आहे. नवी लोकसभा त्यापूर्वी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. आंध्र प्रदेश, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा विधानसभेची मुदत जून महिन्यात वेगवेगळ्या तारखांना समाप्त होत आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांची घोषणा करताना सांगितलं की, 'आमची पूर्ण तयारी झाली आहे. भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत. जागतिक पातळीवर भारताचा गौरव वाढेल या पद्धतीनं निवडणुका करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. 

निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार देशात 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. 10.5 लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र असून 55 लाख EVM चा वापर होईल. एकूण मतदारांमध्ये 49.7 कोटी पुरुष, 47.1 कोटी महिला आणि 48 हजार तृतीयपंथी आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 1.8 कोटी आहे. 

देशभरात 85 पेक्षा जास्त वयाचे 82 लाख आणि 100 पेक्षा जास्त वयाचे 2.18 लाख मतदार आहे. दर हजार पुरुषांमागे 948 महिला मतदार असून 12 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.  85 पेक्षा जास्त वयाच्या तसंच 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरातून मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. आम्ही त्यांच्या घरी जाऊन मतदानपत्रिका देऊ, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

निवडणुकीच्या दरम्यान हिंसंक घटनांना कोणताही थारा देण्यात येणार नाही. हिंसाचारासंबंधीची कोणतीही तक्रार 100 मिनिटांमध्ये दूर करण्यात येईल. त्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय. गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. देशाच्या सीमेवर ड्रोननं टेहाळणी करण्यात येईल. आत्तापर्यंत 3400 कोटी रुपये पैसा जप्त करण्यात आलाय. काही राज्यांमध्ये पैशांचा वापर जास्त प्रमाणात होतो, असंही त्यांनी सांगितलं. 

गेल्या लोकसभा (2019) निवडणुकांची घोषणा 10 मार्च रोजी करण्यात आली होती. 11 एप्रिलपासून सात टप्प्यात मदतान झालं होतं. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं (भाजपा) 303 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. विरोधी पक्षनेतापद मिळवण्यासाठी आवश्यक जागा जिंकण्यात काँग्रेसला अपयश आलं होतं.
 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination