मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रभावाची पहिली मोठी परीक्षा आगामी लोकसभा निवडणुकीत होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होतं शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्षाचा ताबाही त्यांना मिळाला. कायदेशीर लढाई जिंकलेले शिंदे निवडणुकीच्या महासंग्रामात यशस्वी होणार का? हे या निवडणुकीत स्पष्ट होईल. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. या जिल्ह्यातील कल्याण हा तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्यानं येथील निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
2009 साली ठाणे कल्याण हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावर्षी झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे विजयी झाले. 2014 साली श्रीकांत शिंदे यांनी इथून बाजी मारली. गेल्या दहा वर्षांपासून शिंदे येथील खासदार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेना पक्षात फुट पडली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या गोष्टीचा फायदा खासदार श्रीकांत शिंदेना झाला. आपण या मतदारसंघासाठी मोठा निधी आणल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.
काय आहेत प्रश्न?
डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात केमीकलचे कारखाने आहेत. त्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. त्याचबरोबर या परिसरातील 27 गावं कल्याण डोंबिवली महापालिकेपासून वेगळी व्हावी आणि त्यांची स्वतंत्र नगर परिषद असावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. कल्याण आणि डोंबिवली शहर ही नोकरदारांची शहरं म्हणून प्रसिध्द आहे. मुंबईत घरांच्या किंमती वाढल्यानं ही मंडळी या भागात स्थायिक झाली. घरांची मागणी वाढल्यानं या परिसरात अनधिकृत बांधकामांचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
शहराची लोकसंख्या अफाट वाढलेली असताना अद्यापही लोकलची संख्या वाढली नाही. त्यामुळे मुंबईला जाणा-या सर्वांना रोज मनस्ताप सहन करावा लागतो. शासकीय रूग्णालयात कोणतीही सोय नसल्याने रूग्णांना ठाणे, मुंबईकडे धाव घ्यावी लागते. शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे कल्याण - डोंबिवलीहून ठाणे गाठणे अतिशय जिकरीचे आहे. शहरातील अरूंद रस्त्यांमुळे प्रत्येक चौकात वाहतुक कोंडीचा समाना करावा लागतो. काही गावं आणि मोठ्या सोसायटींमध्ये पाणी टंचाई आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी वेगळे धरण हवे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जातेय.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्व , कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ , मुंव्रा - कळवा या सहा मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड (भाजप), कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील (मनसे), डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप), उल्हासनगर कुमार आयलानी (भाजप), अंबरनाथ बालाजी किणीकर ( शिवसेना) , मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड ( राष्ट्रवादी -शरद पवार गट) हे आमदार आहेत. एकुणच सहा पैकी चार जागा महायुतीकड असून एक जागा महिवकास आघाडी आणि एक जागा मनसेकडे आहे.
शिंदेंना अंतर्गत विरोध
कळवा -मुंब्रा चे आमदार जितेंद्र आव्हाड शिंदेंना मदत करणार नाहीत. तर, उल्हासनगरमधील ओमी कलानी श्रीकांत शिंदे माझे चांगले मित्र असल्याने मी त्यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. भाजपा-शिवसेनेच्या वादात मनसे काय भूमिका घेणार हे देखील महत्त्वाचं असेल.
विरोधकांचा उमेदवार कोण?
विरोधकांचा उमेदवारासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना -उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे नाव आघाडीवर आहे. याव्यितरीक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर, दिलीप मालवणकर, वरूण सरदेसाई यांचीही नावे चर्तेत आहेत. दिलीप मालवणकर यांनी उल्हासनगर पालिकेत विरोधी पक्ष नेते पद भूषिवले आहे. तर वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरेचे सख्खे मावसभाऊ आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसचे संतोष केणे यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world