जाहिरात
This Article is From Mar 13, 2024

वडील माजी मुख्यमंत्री... भाऊ मंत्री..नवरा सुपरस्टार; प्रसिद्ध अभिनेत्याची बायको निवडणुकीच्या रिंगणात

या उमेदवाराचे वडील मुख्यमंत्री होते. या उमेदवाराचा भाऊ हा सध्या मंत्री असून या उमेदवाराचा पती हा एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेता आहे.

वडील माजी मुख्यमंत्री... भाऊ मंत्री..नवरा सुपरस्टार; प्रसिद्ध अभिनेत्याची बायको निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई:

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election)  विविध पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्ष विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उमेदवारी देऊन त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण हे याचे ताजे उदाहरण आहे.  तृणमूल काँग्रेसने त्याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.  यापूर्वी तृणमूल काँग्रेसनेच नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या दोन अभिनेत्रींना उमेदवारी दिली होती आणि या दोघीही निवडून आल्या होत्या. जवळपास सगळेच पक्ष अभिनेते,क्रिकेटपटू यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींना उमेदवारी देताना दिसतात.

काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीसाठी एक असा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे की ज्यामुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठीत लढतींच्या यादीत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. या उमेदवाराचे वडील मुख्यमंत्री होते. या उमेदवाराचा भाऊ हा सध्या मंत्री असून या उमेदवाराचा पती हा एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेता आहे. 

ज्या उमेदवाराबद्दल आम्ही बोलत आहोत त्या उमेदवाराच्या सासऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरणामुळे संपूर्ण देश हादरला होता आणि या अपहरणनाट्यावर चित्रपट, माहितीपटही निघाले आहेत. या उमेदवाराच्या दीराचे अकाली निधन हे असंख्य चित्रपटरसिकांच्या मनाला चटका लावणारे ठरले होते. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने हा उमदा अभिनेता मृत्यूमुखी पडला होता. 

Latest and Breaking News on NDTV

गीथा शिवाराजकुमार असं या उमेदवाराचे नाव असून त्यांना शिवमोग्गा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. गीथा यांचे वडील एस.बंगारप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. शिवमोग्गा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड होती. शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरब मतदार संघातून गीथा यांचे बंधू मधू बंगारप्पा हे निवडून आले असून ते कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. नमूद करण्याजोगी बाब ही आहे की मधू बंगारप्पा यांच्या विरोधात त्यांचा सख्खा भाऊ कुमार बंगारप्पा याने निवडणूक लढवली होती. कुमार यांनी भाजपकडून तर मधू यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 

Latest and Breaking News on NDTV

गीथा यांच्याविरोधात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचा मुलगा बीवाय राघवेंद्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुले या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आली आहेत. काँग्रेसला या जागेवर अभिनेता शिव राजकुमार यांना उभे करायचे होते मात्र त्यांनी आपल्याऐवजी आपल्या पत्नीला उमेदवारी देण्यास सांगितले होते. शिव राजकुमार यांचा कर्नाटकात मोठा चाहता वर्ग असून त्यांचे वडील राजकुमार आणि भाऊ दिवंगत पुनीथ राजकुमार यांना अफाट प्रसिद्धी मिळाली होती. राजकुमार यांचे चंदनतस्कर वीरप्पनने अपहरण करून खळबळ उडवून दिली होती. पुनीथ याचे तरुण वयात निधन झाले होते. त्याच्या जाण्याने कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.        

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com