बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा झालेली लढत संपूर्ण देशात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या होत्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हा मोठा धक्का ठरला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 2 महिन्यांनी अजित पवारांनी याबाबत मोठी कबुली दिली आहे.
सुनेत्री पवार यांना लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं करणं ही चूक होतीस अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. 'कुणीही राजकारण घरात आणू नये,' असं त्यांनी सांगितलं. अजित पवार सध्या जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
'माझं माझ्या सर्व बहिणींवर प्रेम आहे. कुणीही राजकारण घरात आणू नये. सुनेत्रा पवार यांना बहिणीविरुद्ध उभा करुन मी चूक केली. ते व्हायला नको होतं. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीनं तो निर्णय घेतला. मला आज ते चुकीचं वाटत आहे,' असं अजित पवारांनी सांगितलं.
बारामती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची जुलै महिन्यात राज्यसभेवर निवड झाली आहे.
( नक्की वाचा : 'अजित पवारांना बारामती कळलीच नाही', सुप्रिया सुळेंनी सांगितलं विजयाचं रहस्य! )
राखी पौर्णिमेला बहिणीच्या घरी जाणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी सध्या दौऱ्यावर आहे. मी आणि माझी बहिण त्या दिवशी एकाच गावात असू तर मी तिची नक्की भेट घेईन.'
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आणि कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देणार नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक )
आपण या दौऱ्यात फक्त विकासाच्या योजना. तसंच महिला आणि तरुणांच्या विषयावर बोलणार आहे. माझ्यावर केलेल्या टिकेला उत्तर देणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.