विरोधी पक्षनेतेपदावरुन मतभेद! अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेस विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला?

महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन्ही पक्षांची संख्या इतकी कमी आहे की त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणंही कठीण आहे. त्यानंतरही महाविकास आघाडीत या पदावरुन मतभेद झाल्याची माहिती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत नियम?

महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त 10 आमदार आहेत. त्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विरोधकांनी केलीय. शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून नियमही जाणून घेतले आहेत. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत 10 टक्के संख्या आवश्यक असते..महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. पण, महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडे एवढं संख्याबळ नाही

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही हा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी (8 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती केली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
 

'दिल्ली पॅटर्न'वर आशा

यापूर्वी  दिल्ली विधानसभेत संख्याबळ नसूनही भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं 2015 सालच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे 67 आमदार निवडून आले.. यावेळी भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या.  त्यामुळे भाजपला विरोधी पक्षनेतेपदी मिळणं कठीण होतं. तरीही दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्रीअरविंद केजरीवालांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं.. महाराष्ट्रात हाच 'दिल्ली पॅटर्न' राबवल्यास महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं.

महाविकास आघाडीत मतभेद

राज्यात 'दिल्ली पॅटर्न' लागू होऊन विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा महाविकास आघाडीला आहे. याबाबतचा अधिकृत निर्णयापूर्वी  महाविकास आघाडीत यावरुन मतभेद सुरु झाल्याची माहिती आहे.

Advertisement

( नक्की वाचा : महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर )
 

विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावं अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. आता  भाजपचे नेते महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद देणार का? त्यांनी हे पद देण्याचा निर्णय दिला तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण होणार? हे पाहावं लागणार आहे.