अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मुरब्बी मातब्बर नेते शरद पवार यांनी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले होते. शिंदेंचे कौतुक आणि ते ही शरद पवारांनी केल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा संताप झाला. शिवसेना नेते खा.संजय राऊत हे खरं तर शरद पवार यांचे लाडके चेले आहेत. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर "शिवसेनेची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीकाही करत असतात. पण शिंदेंच्या कौतुकामुळे त्यांचीही सटकली. त्यांनीही याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना शरद पवारांवर टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल दिल्ली साहित्य संमेलनाच्या आयोजकांवरही तिखट शब्दात टीका केली. संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरु आहे, असा हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने याबद्दल नाराजी व्यक्त केली पण ती करताना संयम ठेवला. त्यामुळे शिवसेनेचे आकांडतांडव अनावश्यक होते का ? शिंदेंचे कौतुक केल्यास ठाकरे गटाचा जळफळाट होईल, याची जाणीव शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना नसेल का? तरीही त्यांनी असे का केले ? मुळात या कार्यक्रमाचे निमंत्रणच का स्वीकारले ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. केवळ दिल्लीतील पुरस्कार सोहळा या प्रतिक्रियेला कारणीभूत होता,असे समजणे चुकीचे ठरेल. त्याची पार्श्वभूमी, महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले सध्याचे शह–काटशहाचे राजकारणही या वादाला कारणीभूत आहे.
2019 ला महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली त्यात शरद पवार यांचा रोल खूप मोठा होता. अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी 2014 पासून ज्या खेळ्या केल्या, जे बीजारोपण केले त्याची ती परिणीती होती. महाविकास आघाडीचा जन्म, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणे यात पवारांचे योगदान मोठे होते. त्याची सुरुवात 5 वर्ष आधी झाली होती. 2014 ला देशात मोदी पर्व सुरू झाले.
( नक्की वाचा : Eknath Shinde : 'शरद पवारांनी मला कधी गुगली टाकला नाही', दिल्लीतील कार्यक्रमात शिंदेंचा सिक्सर )
महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर काबीज करण्याचे " शत प्रतिशत भाजपा"चे गेले अनेक वर्ष उराशी जपलेले स्वप्न साकार करण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले. या निवडणुकीत महाराष्ट्रात सगळेच पक्ष स्वबळावर लढले. पण स्वबळावर सत्ता काबीज करण्याचे भाजपाचे स्वप्न थोडक्यात हुकले. बहुमताला 23 आमदार कमी होते. 99 साली वेगळ्या लढलेल्या दोन काँग्रेस जशा निवडणूक होताच एकत्र आल्या त्याप्रमाणे शिवसेना–भाजपही एकत्र येतील याचा पवारांना अंदाज आला असावा.
मतमोजणी होण्यापूर्वीच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यामुळे पुन्हा भाजपासोबत जाण्याची मानसिकता असलेल्या शिवसेनेची "बार्गेनिंग पॉवर"च निघून गेली. भाजपाने शिवसेनेला सोबत घेतले. पण त्यांना सत्तेचा अपेक्षित वाटा मिळाला नाही. तेव्हा या दोन पक्षातील संबंधांना जो तडा गेला, तो नंतर जुळलाच नाही. अवमान होऊनही शिवसेनेने हा लग्नानंतरचा संसार 5 वर्ष टिकवला. या पाच वर्षात राष्ट्रवादी सतत भाजपाच्या संपर्कात होती आणि तब्बल तीन वेळा सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत बोलणीही झाली होती, असे स्वतः अजित पवार हेच सांगतायत. याचाच अर्थ 2014 ला भाजपाला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊन युतीत जी दरी निर्माण केली गेली, आणि ही दरी कायम राहील या दृष्टीनेही पुढचे पाच वर्ष सुरू होते असेच म्हणावे लागेल. याचाच परिणाम 2019 ला दिसला.
( नक्की वाचा : पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र)
भाजपा आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या. पण निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेऊन पाच वर्षातील अवमानाची व्याजासह परतफेड केली. याची आठवण देण्याचे कारण म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय खेळ्या या तात्कालिक नाही, तर दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून केलेल्या असतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
एकनाथ शिंदे यांनी 2022 ला दोन तृतीयांश आमदार व खासदार फोडून आपली ताकद दाखवली होती. त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे खरे आहे, पण एवढे लोक आपल्यासोबत आणणे सोपे नव्हते. तरीही या फोडाफोडीचे श्रेय भाजपाला किंवा शिंदेंच्या पाठीशी उभ्या असलेल्या महाशक्तीला दिले तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी मिळवलेल्या यशाकडे डोळेझाक कशी करता येईल. लोकसभा निवडणुकीत भाजपसारख्या मातब्बर पक्षाला महाराष्ट्रात केवळ 9 खासदार निवडून आणता आले, तेथे शिंदे यांनी 15 जागा लढवून सात खासदार निवडून आणले.
विधानसभेला 80 जागा लढवून 57 आमदार निवडून आणले. महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एवढे आमदार निवडून आणता आलेले नाहीत. शिंदे यांनी आपली ताकद दाखवली. पण त्यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळूनही मुख्यमंत्रीपद काही मिळाले नाही. अपेक्षित खातीही मिळाली नाहीत. पालकमंत्री पदापासून सर्व बाबींसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता शरद पवारांनी हेरली असावी आणि त्यांच्या पाठीवर शाबासकी देऊन थोडे कौतुक केले असेल. भविष्यात महायुतीत काही पेच निर्माण झाला तर एक पर्याय तुमच्यासमोर आहे, याचे संकेत देताना शिंदे यांना लढण्यासाठी बळ दिले आहे. त्याचवेळी निवडणुकीत मोठा दणका बसल्यापासून भाजपाशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि स्वबळाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवणाऱ्या ठाकरे सेनेलाही शरद पवारांनी गर्भित इशारा दिला आहे.
( नक्की वाचा : 2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट )
एकनाथ शिंदे यांना दबावाखाली ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केलेली जहरी टीका विसरून देवेंद्र फडणवीस त्यांच्याबद्दल प्रेम दाखवत असतील, तर शरद पवार एकनाथ शिंदे यांच्याबद्दल थोडी तरी आपुलकी दाखवणारच की. दिल्लीत होत असलेले साहित्य संमेलन, त्यानिमित्ताने झालेला सत्कार सोहळा हा कदाचित योगायोग असेलही. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांचे एक वाक्य या निमित्ताने आठवले, ते म्हणजे In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way. याचाच अर्थ राजकारणात अपघाताने काहीही घडत नसते, आणि घडलेच तर ते तसेच घडवण्याचे नियोजित केले होते असे समजून जावे.
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शिंदेंना पुरस्कार मिळणे हा वेगळा कार्यक्रम असेल. पण त्याचे निमंत्रण पवारांनी स्वीकारणे व त्या कार्यक्रमात शिंदे यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाबद्दल कौतुक करणे नक्कीच दीर्घकालीन राजकारण समोर ठेऊन केलेले बीजारोपण आहे,असे दिसतेय एवढे नक्की.
"ऑपरेशन टायगर"मुळे ठाकरे गटात अस्वस्थता !
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने सत्ताधारी महायुतीपुढे "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" चा वेगळा प्रश्न निर्माण झाला होता. महायुतीतील सगळ्याच पक्षात सत्तेतील पदासाठी मोठी गर्दी आहे. मोजकी पदे आणि अनेक दावेदारांमुळे मंत्रिमंडळ रचनेपासून प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्र्यांना बरीच कसरत करावी लागते आहे. पण सत्ता, सामर्थ्य आणि संपत्ती याची भूक कधी संपत नसते. त्यात भर घालण्याचा, विरोधकांचे आणखी खच्चीकरण करण्याचे डावपेच सुरूच असतात.
केंद्रात भाजपकडे यावेळी स्वतःचे बहुमत नाही. त्यामुळे भविष्यात सरकारला पाठींबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर पर्याय म्हणून शक्य तेवढे संख्याबळ जमवून ठेवण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. तर आपले राजकीय महत्त्व पुन्हा वाढवायचे असेल तर शक्ती वाढवावी लागेल, याची जाणीव असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही शक्ती संवर्धन करतायत. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला.
केंद्रात आणि राज्यात पुढची 5 वर्ष विरोधात बसावे लागणार आहे. मुंबई महापालिका ही शेवटची आशा आहे. तेथेही सत्ता नाही मिळाली तर उरली सुरली संघटना वाळूचे धरण फुटावे अशी फुटेल, अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे आत्तापासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या व पक्षातील आपल्या भवितव्याबाबत चिंतेत असणाऱ्या लोकांना हेरून त्यांना आपलेसे करण्याचे काम शिंदे यांनी सुरू केलेय. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांना गळाला लावण्यासाठी शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात याचा "ऑपरेशन टायगर" असा उल्लेख केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील दिल्लीतील एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. तर शिंदेसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या भोजनाला उद्धव ठाकरेंच्या तीन खासदारांनी हजेरी लावली. यामुळे अस्वस्थ झालेल्या आदित्य ठाकरे यांनी तत्काळ दिल्लीला धाव घेतली. खासदारांशी संवाद साधला. परवानगी घेतल्याशिवाय कोणाकडे जेवायला जायचे नाही, असे सांगण्याचा आगाऊपणा करून त्यांची नाराजी ओढवून घेतली. इकडे मुंबईत ठाकरे सेनेचे कडवे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्याच किरण सामंत यांनी त्यांचा विधानसभेला पराभव केला होता व त्यांनीच शिंदेंच्या शेजारी उभे राहून राजन साळवी यांचे पक्षात स्वागत केले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात साळवी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कधीच फारसे सख्य नव्हते. तरीही त्यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिंदे यांच्याकडे येणे अधिक सुखाचे का वाटावे हा प्रश्न आहेच. रत्नागिरीच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू माजी खासदार विनायक राऊत आणि राजन साळवी यांचाही संघर्ष आहे. आपल्या पराभवाला यांनीच हातभार लावल्याचा दोघांचाही आरोप आहे.
या संघर्षात उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची बाजू घेतल्याने राजन साळवी यांच्यासमोर पर्यायच नव्हता. याशिवाय चौकशांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला होता. दोन्ही बाजूला संघर्ष करत बसण्यापेक्षा सत्तेच्या सावलीत बसलेले बरे असा व्यवहारिक विचार त्यांनी केला असावा. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवारांसोबत असलेल्या खासदारांना आपल्या सोबत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकुणात काय तर बहुमत असूनही महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला बहर आलाय.
भेट आणि चेकमेट !
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून गेले दोन अडीच महिने महाराष्ट्रात आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या हत्येमुळे जनक्षोभ उसळल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह काही लोकांना अटक झाली. एक आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणा नंतर बीड जिल्ह्यातील स्थिती बिहारलाही लाजवणारी झाली असल्याचे चित्र समोर आले. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकीय मतभेद व व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेऊन, बीडमधील गुन्हेगारी व त्याला राजाश्रय दिल्याचा आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात युद्ध पुकारले. भाजपा आमदार सुरेश धस यांनी या लढ्याचे नेतृत्व स्वत:कडे घेतले व आरोप आणि टीकेची राळ उठवली होती. "आका" हा शब्द त्यांनी प्रचलनात आणला.
महायुतीतील राष्ट्रवादीचे मंत्री व भाजपाचे आमदार असा संघर्ष पेटल्याने व कोणीही कोणाला रोखत नसल्याने नेमके काय चालले आहे हेच कळत नव्हते. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण लावून धरले होते. अंजली दमानिया यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रिपदाच्या काळातील भानगडी बाहेर काढल्या.
धनंजय मुंडे यांच्याबरोबरच्या संबंधांमुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनीही आरोप केले. यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर गंडांतर येणार की काय ? अशी स्थिती होती. या प्रकरणाशी संबंध आहे हे चौकशीत पुढे येत नाही तोवर केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने तेवढाच काय तो आधार मुंडे यांना होता. त्यांच्या भोवती आरोपांचे जाळे आवळत चालले आहे असे वाटत असताना एक दिवस अचानक सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याचे बाहेर आले आणि एकच गोंधळ उडाला.
गुप्त भेटीची बातमी फुटल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दोघांनीही याचा इन्कार केला. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याने त्यांची पंचाईत झाली. मग धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची सारवासारव करण्यात आली. पण नंतर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने त्यांच्या घरी या दोघांची साडेचार तास भेट झाल्याचे समोर आले. यामुळे सुरेश धस गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात जी मोहीम चालवत होते त्याबद्दलच संशय निर्माण झाला आहे.
महायुतीचीच मंडळी ठरवून दोन्ही बाजूने लढत होती, असे आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचे राजकारण केल्याची टीका त्यांच्यावर होतेय. या गुप्त भेटीची बातमी फोडून आपल्याला अडचणीत आणण्यामागे षडयंत्र असल्याचा संशय खुद्द सुरेश धस व्यक्त करत आहेत. बातमी कोणी फोडली यापेक्षा गुप्त भेट घेण्याचे कारणच काय ? असाही सवाल उपस्थित केला जाईल. गेल्या दोन महिन्याच्या संघर्षामुळे धस यांची जी प्रतिमा तयार झाली होती त्याला मात्र या भेटीमुळे तडा गेला आहे, एवढे नक्की .