
Jitendra Janawale : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) पक्षातील गळती सुरुच आहे. संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, कोकणातील दिग्गज नेते राजन साळवी यांनी यापूर्वी या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यापाठोपाठ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिला शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिलाय. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर मशाल घेऊन मातोश्रीवर आलेले कार्यकर्ते अशी जानवळे यांची ओळख आहे.
जानवळे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून खळबळजनक पत्र लिहिलं आहे. हे पत्र NDTV मराठीच्या हाती आलंय. या पत्रात मागील सहा वर्षे कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्ती करून राजकीय गोची करण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप जानावळे यांनी केला आहे. त्याचबरोबर विभाग प्रमुख अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपल्याला पक्षामध्ये जाणून बुजून डावले जात आहे. याबाबत व्यथा मांडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. क्षमता असूनही डावलले जात असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे जितेंद्र जानावळे यांनी पत्रात लिहिलं आहे
वाचा जितेंद्र जानवळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं संपूर्ण पत्र
साहेब, सविनय जय महाराष्ट्र...!
'साहेब मला माफ करा...'
मी आपणाकडे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा देत आहे.
साहेब, गेली सहा वर्ष मला माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करून माझी राजकीय गोची करण्याचे षडयंत्र विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. साहेब गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी घर सोडून भाजपाच्या विरोधात निवडणूक जोमाने लढलो. अवघ्या थोड्याच मतांनी हरलो, पण खचलो नाही आणि परत जिद्दीने माझे संघटनात्मक जनसेवेचे, रुग्णसेवेचे काम विभागात चालू ठेवले.
( नक्की वाचा : Rajan Salvi :2014 साली मंत्री झालो असतो, पण... ठाकरेंची साथ सोडताना राजन साळवींचा मोठा गौप्यस्फोट )
डोक्यात एकच विचार होता एकदा तरी विलेपार्ले विधानसभेतील माझ्या वॉर्ड 71 मध्ये विजयाचा भगवा फडकविणार पण दुर्दैव मला विभागप्रमुख मा अनिल परब साहेबांनी गेली सहा वर्ष विभागातून बाजूच्या विधानसभेत म्हणजे बाहेर ठेवले वारंवार विभागप्रमुख मा. अनिल परब साहेबांना विभागात परत घेण्याची विनंती मी केली पण त्यांनी फक्त तारखाच दिल्या आणि निराशा केली.
एवढेच नाही तर मी वास्तव्यास असलेल्या असलेल्या विलेपार्ले विधानसभेच्या बैठकींना मी स्थानिक पदाधिकारी नसल्यामुळे मला अपमान ही सोसावा लागला. हे सर्व मला डावलण्याचे प्रकार माझ्या सोबत जाणूनबुजून होत होते हे मला जाणवत होते. तरी ही मी सहा वर्ष संयम ठेऊन संघटना वाढीसाठी काम करीत राहिलो.
साहेब, या बाबत मी आपल्याला आणि मा. आदित्य साहेबांना मातोश्री येथे प्रत्यक्ष भेटून विभागात चुकीच्या पद्धतीने चाललेल्या संघटनात्मक पद्धतीची व्यथा मांडली परंतु आपणाकडून ह्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही.
( नक्की वाचा : Eknath Shinde : 'शरद पवारांनी मला कधी गुगली टाकला नाही', दिल्लीतील कार्यक्रमात शिंदेंचा सिक्सर )
साहेब, आंदोलनात पुढे असणारा, पोलिसांच्या लाठ्या खाणारा, आंदोलनाच्या केसेसबाबत कोर्टात फेऱ्या मारणाऱ्या माझ्या सारख्या संघटनात्मक व सामाजिक करणाऱ्या शिवसैनिकाची जर ही परिस्थिती होत असेल तर नेमका निकष काय लावला ? हा प्रश्न मनाला भेडसावतो.
साहेब, या सर्व संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो असून मला कोणाच्या दबावाखाली आणि कार्यरत असलेल्या विभागाच्या बाहेर पदाधिकारी म्हणून काम करायला एक शिवसैनिक म्हणून जमणार नाही.
साहेब, माझी क्षमता असतानाही मला डावलण्यात येते हे मी किती दिवस सहन करायचे हा विचार करत बसण्यापेक्षा मी माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा जड अंतःकरणाने आपणाकडे या पत्राद्वारे देत आहे.
"साहेब मला माफ करा"
आपला नम्र,
जितेंद्र जानावळे शिवसैनिक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world