Maharashtra Cabinet Reshuffle : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांच्या मंत्रीमंडळातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
कोकाटे यांच्या अडचणीत भर
नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाने आता कोकाटे यांची कोंडी केली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी, सध्यातरी त्यांच्या मंत्रीपदावर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे.
अजित पवार यांच्यावर पक्षांतर्गत दबाव
या प्रकरणात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्यावरील कायदेशीर कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढू लागला आहे. पक्ष स्वच्छ प्रतिमेसाठी कोकाटे यांना मंत्रीपदावरून बाजूला करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
एका मंत्र्यावर अटकेची वेळ येणे हे सरकार आणि पक्षासाठी भूषणावह नसल्याची भावना पक्षातील काही नेत्यांमध्ये आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कोकाटे यांची गच्छंती होण्याची चिन्हे दिसत आहेत.
(नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 29 महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला, मतदान, मतमोजणी कधी? वाचा A to Z माहिती )
धनंजय मुंडे आणि अमित शाह यांची भेट
या सर्व गोंधळात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. धनंजय मुंडे हे ओबीसी समाजातील एक मोठे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सध्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्याने, पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रीमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. कोकाटे यांचे पद गेल्यास त्या जागी मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
छगन भुजबळ यांच्या तब्येतीच्या कुरबुरी आणि कोकाटे यांच्यावर झालेली कायदेशीर कारवाई यामुळे अजित पवार यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यासारखा आक्रमक नेता मंत्रीमंडळात असणे पक्षासाठी फायद्याचे ठरू शकते. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि राज्यातील बदलती परिस्थिती पाहता, लवकरच राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. आता न्यायालय कोकाटे यांना दिलासा देते की त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.