लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
राज्यातील मराठ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या या उपोषणाचा आज (मंगळवार, 11 जून) चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका, तसंच चर्चा करण्याची सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'चर्चा करून गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा अंदाज दिसतो,' असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माझ्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसून मला खेळवणं सुरु आहे. सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठा समाज चांगला हिसका दाखवेल, असा इशारा जरांगे यांनी दिलाय. जरांगे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही उपचार घेण्यास नकार दिलाय. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरने मोठं काम केलं. भाजपसह महायुतीला राज्यात याचा मोठा फटका बसला. मराठवाड्यातील आठपैकी फक्त एक जागा महायुतीला जिंकता आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले. मराठा आरक्षणचा केंद्रबिंदू असलेल्या जालना मतदार संघात सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागला.
( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे यांनी चौथ्यादा उपोषणाला सुरुवात करून सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही किंवा मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करण्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता जरांगे यांच्या उपोषणाला राज्य सरकार कशा प्रकारे हाताळतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world