उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले पुस्तक शनिवारी प्रकाशित होणार आहे (Narkatla Sawrg book written by Sanjay Raut) . न्यू एरा पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला लेखक, कवी पटकथाकार जावेद अख्तर (Javed Akhtar) हे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी तुरुंगातील त्यांचे अनुभव विस्ताराने लिहिले आहेत.
संजय राऊत यांनी या पुस्तकातील एका प्रकरणात म्हटलं आहे की, मी ज्या कोठडीत होतो, तिचा बाहेरच्या जगाशी कसलाही संबंध उरला नव्हता. गेले कित्येक दिवस मी सूर्यप्रकाश पाहिला नाही. प्रकाशकिरणं अंगावर पडली नाहीत. छातीत सहा स्टेन्टस आहेत. किमान रोज दीड तास चालायलाच हवं, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाहेर असताना पहाटे साडे पाच वाजता चालणं होत असे. इथे पंधरा पावलंही चालणं होत नाही. माणसांचे आवाजही कानी पडत नाहीत. कारागृह पोलीस येतात. डोकावून जातात. त्यांच्या भाषेत गिनती होते. आतला बंदी हालचाल करतोय ना ! एवढंच ते पाहतात. ब्रिटिश काळापासून हीच पद्धत आहे. ते तरी काय करणार?"
नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव
राज ठाकरेंची चेष्टा जिव्हारी लागली
संजय राऊत यांनी या पुस्तकातील एका प्रकरणातील मजकुरामुळे संजय राऊत हे राज ठाकरेंमुळे कमालीचे दुखावले दिसते आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून संजय राऊत यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. राज ठाकरे यांनी मनसे पक्ष काढल्यानंतरही दोघांमधील सख्य चांगले होते. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरू केली तेव्हा राज ठाकरेंनी याबाबत एक विधान केले होते. संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!' असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. तुरुंगाच्या कोठडीत आरोपी एकटा असतो, त्यामुळे आता त्यांनी एकट्याशीच बोलणे सुरू करावे असा साधारणपणे राज ठाकरे यांच्या विधानाचा रोख होता.
नक्की वाचा :पालिका निवडणुकीत 'मविआ राहणार का? मातोश्रीवरील भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ महत्त्वाचं बोलले!
'नरकातला स्वर्ग'मध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, "खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नातं कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्षे जवळून काम केलं. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही." राज ठाकरेंच्या विधानामुळे संजय राऊत हे कमालीचे दुखावले गेल्याचं त्यांच्या या वाक्यांवरून स्पष्ट होत आहे.